विविध योजना आणि उपायांबाबतची शिक्षण विभागाची आरंभशूरता शालेय वाहतूक नियमनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तरी संकेतस्थळही अद्ययावत करण्यात आलेले नाही. सुरक्षा परवान्यांची मुदत संपलेल्या बसेस विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत.
शाळेच्या बसमध्ये घडलेल्या दुर्घटनांनंतर शालेय वाहतुकीचा विषय शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतला. मात्र प्रत्यक्षात अजूनही अनेक नामवंत शाळांच्या बसेसची सुरक्षा प्रमाणपत्रे अद्ययावत करण्यात आली नसल्याचे शालेय वाहतूकीच्या नियमनासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावरून समोर येत आहे. शाळांच्या अनेक बसेसची सुरक्षा प्रमाणपत्रांची मुदत संपली आहे. काही ठिकाणी चालकाच्या परवान्याची मुदत संपली आहे. अजूनही विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी याच बसेस धावत आहेत. त्यामध्ये अनेक नामवंत शाळांचाही समावेश आहे.
परिवहन विभाग आणि शालेय शिक्षण विभागाने एकत्रितपणे संकेतस्थळही सुरू केले. अगदी पालकांनाही वाहनांची, त्यांच्या चालक, मालक यांची माहिती मिळावी, त्याची खातरजमा करता यावी, वाहनाची परवानगी आणि संबंधित तपशील उपलब्ध व्हावेत हा हेतू होता. मात्र हे संकेतस्थळ सुरू केल्यानंतर ते अद्ययावत करण्याकडे लक्ष देण्यात आलेच नाही. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. स्वत:च्या बसेस असणाऱ्या शाळांमध्ये सीबीएसईच्या शाळांचे प्रमाणही मोठे आहे. मात्र संकेतस्थळांवर अनेक शाळांची दोन वर्षांंपूर्वीची माहिती आहे. अगदी मोजक्याच शाळांनी गेल्यावर्षी म्हणजे २०१५ मध्ये माहिती अद्ययावत केली आहे. या संकेतस्थळावर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील साधारण साडेचार हजार शाळांची नोंद आहे. मात्र शालेय वाहतुकीचे सर्व तपशील उपलब्ध करून देणाऱ्या शाळा या एक ते दीड हजारच असल्याचे दिसत आहे. अनेक शाळांनी सुरक्षा, परवाने यांबाबतची माहिती सोयीस्करपणे दडवल्याचेही समोर येत आहे.
ठरावीक कालावधीनंतर परिवहन विभाग, शालेय शिक्षण विभाग, शाळांचे प्रतिनिधी यांच्या बैठका होतात. त्यामध्ये नियमावलीचे पालन करण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात येतात, मात्र त्याचे प्रत्यक्षात पालन होते का याची पाहणी मात्र शिक्षण विभागाकडून करण्यात येत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा