पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने तूर्त पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. महिनाभरानंतरची परिस्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेऊ, असे पालिका आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.
पुण्यातील धरणांचा साठा व पावसाने दिलेली ओढ लक्षात घेऊन १५ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पुणे पालिकेने घेतला. या संदर्भात, पत्रकारांनी आयुक्तांशी संवाद साधला असता ते म्हणाले, अन्य धरणांच्या तुलनेत पवना धरणाची परिस्थिती चांगली आहे. सद्यस्थितीत धरणात ७५ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. पुढील महिनाभरात चांगला पाऊस पडावा आणि पाण्याचा साठा ९० टक्क्य़ांपर्यंत जावा, अशी अपेक्षा आहे. मात्र अपेक्षित पाऊस पडलाच नाही व ८० टक्के पाणीसाठय़ावरच थांबावे लागले, तरच पाणीकपात करावी लागेल आणि ती कपात काही टक्क्य़ांपर्यंतच असेल. महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे भविष्यात काही प्रमाणात पाणीकपात करावी लागेल, या दृष्टीने शहरवासियांनी मानसिकता ठेवावी. तथापि, तूर्त पाणीकपातीचा विचार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा