पाठपुरावा करूनही माहिती देण्यास टाळाटाळ; मुख्य जल परीक्षकांना त्रोटक माहितीचा पुरवठा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरासाठी ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा अधिक पाणी महापालिका दरवर्षी धरणांमधून उचलते. याबाबत जलसंपदा विभाग आणि महापालिकेमध्ये वाद आहे. या पाश्र्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेला शहराच्या पाणीवापराचे लेखापरीक्षण करण्याची सूचना चार महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, महापालिकेकडून पाणीवापराबाबत अत्यंत त्रोटक माहिती औरंगाबाद येथील मुख्य लेखा परीक्षक जल व सिंचन या राज्यस्तरीय कार्यालयाला देण्यात आली आहे. दिलेली माहिती अपूर्ण असल्याचे वारंवार सांगूनही महापालिकेकडून टाळाटाळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरासाठी ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा अधिक पाणी पुणे महापालिकेकडून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून उचलण्यात येते. हे अतिरिक्त पाणी नेमके जाते कोठे? त्या पाण्याचे काय होते, कोणी चोरी करते का? याबाबतची माहिती घेण्याचे काम पालिकेचे आहे. यासाठी पालिकेने शहराच्या पाणीवापराचे लेखापरीक्षण करावे, अशी सूचना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेला ५ मे रोजी पर्वती जलकेंद्र येथे साकारलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात केली होती. महापालिकेकडून अतिरिक्त पाणी वापरण्यात येत असल्याने शेती आणि सिंचनासाठी पाणी कमी पडत असल्याचा दावा जिल्ह्य़ातील इतर भागातून करण्यात येतो. पाणी नियोजनाचे काम जलसंपदा विभागाकडे आहे. खडकवासला धरणातून शहरासाठी ११ टीएमसी पाण्याचा मापदंड ठरवून दिला आहे. प्रत्यक्षात पालिकेकडून साडेसतरा टीएमसी पाणी उचलले जाते. एका दिवसासाठी प्रतिव्यक्ती १५५ लिटर पाणी आवश्यक असताना ३३५ लिटर पाणी उचलले जाते. ही परिस्थिती पाहता अतिरिक्त पाण्याचा शोध घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

लेखापरीक्षण यासाठी

पाणी लेखापरीक्षणामध्ये किती पाण्याचा अपव्यय झाला आणि त्यातून किती नुकसान झाले, याचा आढावा घेण्यात येतो. येणाऱ्या आणि जाणाऱ्या पाण्याचा हिशेब ठेवणे, वापर आणि पुरवठा यामधील तफावत, महसूल निर्माण करून न देणारे पाणी कमी करणे आणि त्यातून पाणी बचत, गळती व बेकायदा पाणीवापर आदी माहिती औरंगाबाद येथील मुख्य लेखा परीक्षक जल व सिंचन मुख्यालयाला देणे अपेक्षित आहे.

जलसंपदा मंत्र्यांनी पाणी लेखापरीक्षणाचे आदेश दिल्यानंतर पुणे पालिकेचे काही अधिकारी आले. त्यांनी पाणीवापराबाबत काही माहिती दिली. परंतु, ही माहिती अत्यंत त्रोटक असून त्यात काही शंका असल्याचे पालिकेला कळवले आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही आजवर सहकार्य करण्यात आलेले नाही.

– स्मिता मुणगेकर, कार्यकारी अभियंता, मुख्य लेखा परीक्षक जल व सिंचन मुख्यालय

जलसंपदामंत्र्यांच्या आदेशानुसार पाण्याचे लेखापरीक्षण करण्यासंबंधीची कार्यवाही येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येणार आहे.

– व्ही. जी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No water usage audit in the absence of the cooperation
Show comments