मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाने बनावट रिक्षा परवाना काढल्याच्या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन ‘आरटीओ’तील संगणक प्रणाली बदलण्याच्या सूचना केल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर परिवहन विभागातील संगणक प्रणाली बदलण्यात येणार आहे. त्यासाठी २६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या विभागाचे कामकाज करण्यात येणार नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
आरटीओतील कर्मचाऱ्याच्या संगणकाच्या ‘पासवर्ड’चा वापर करून मुख्यमंत्र्यांच्या नावाने रिक्षाचा बनावट परवाना तयार करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणी फसवणुकीबरोबरच माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार नेमका कुणी केला, याचा तपास सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. परवान्याच्या या प्रकरणानंतर आरटीओतील जुनी झालेली संगणक प्रणाली बदलण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती.
संगणक प्रणालीतील बदलाबाबत आरटीओकडून शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे. परिवहन संवर्गात सध्या ‘टुल्स’ प्रणालीवर कामकाज होते. मात्र ही प्रणाली फार जुनी आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेली संगणकीय ‘वाहन’ ही प्रणाली परिवहन संवर्गातील वाहनांच्या कामकाजासाठी २६ नोव्हेंबरपासून कार्यान्वित करण्याचे कामकाज सुरू होणार आहे. ‘टुल्स’वरील सर्व माहिती ‘वाहन’ प्रणालीवर वर्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी २६ ते ३० या कालावधीत परिवहन विभागाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे कामकाज करण्यात येणार नाही. परिवहन संवर्गातील नव्या वाहनांची नोंदणी २६ नोव्हेंबरपासून ‘वाहन’ या संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे १ डिसेंबरपासून सर्व कामकाज ‘वाहन’ प्रणालीद्वारेच करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा