पुण्याचा गणेशोत्सव मानाचा आणि लोकप्रियही. गणेश विसर्जन मिरवणूक हा या उत्सवातील परमोच्च बिंदू. पुण्याच्या काही ठळक वैशिष्ट्यांपैकी असलेल्या या उत्सवाचे आगळेपण गेल्या काही वर्षांत मात्र कर्णकर्कश ‘आव्वाज’ आणि निरनिराळे घातक प्रकाशझोत यांत झाकोळून जाते की काय, असे वाटावे अशी स्थिती आली आहे. विसर्जन मिरवणुकीतील कर्कशता किती आहे, हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासात स्पष्टच झाले आहे. गणेश विसर्जन मिरवणूक जेथून जाते, त्या रस्त्यांवरील काही मुख्य चौकांत हा ‘आव्वाज’ सरासरी ९० डेसिबलच्या वर, म्हणजे माणसाच्या कानांना अजिबात न झेपणारा होता. त्यात लेझर प्रकाशझोतांनी इतक्या जणांचे डोळे शब्दश: दिपवले, की उत्सव संपल्यानंतर नेत्रतज्ज्ञांकडील गर्दी वाढली आहे. ध्वनी आणि प्रकाश प्रदूषणाचे आरोग्यावरील दुष्परिणाम भीतिदायक स्वरूपात समोर येत असतानाच विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या काही अकस्मात मृत्यूंमुळे तर त्याची भीषणता आणखी अधोरेखित झाली आहे.
उत्सवातून उत्साह, ऊर्जा मिळवायची असते. ती न मिळता त्याचा त्रास होत असेल, तर कुठे तरी काही तरी चुकते आहे. आता हे सगळे सातत्याने मांडायचे कशासाठी? तर, उत्सवात होणाऱ्या उन्मादामुळे या उत्सवाने अजूनही मोठ्या प्रमाणावर टिकवलेले विधायकपण झाकले जाऊ नये म्हणून. नकारात्मकतेवर बोट ठेवताना ऊर्जादायी गोष्टींची नोंद हवी, ती त्यासाठीच. देखाव्यांतून विविध संकल्पना, प्रश्न, समस्या मांडण्यासाठी झटणारे, प्रबोधनाचा वसा घेतलेले कार्यकर्ते आणि उत्सव मंगलमय करण्यासाठी झटणारे अनेक अनाम हात या उत्सवाचे विधायक वळण वाकडे होणार नाही, याची काळजी घेत आहेत, हेही विसरून चालणार नाही. यंदाच्या गणेशोत्सवातही याची प्रचिती आली. ऐतिहासिक गोष्टींवरील जिवंत देखावे आणि पौराणिक गोष्टींवरील हलते देखावे हे यंदाचेही प्रमुख आकर्षण होते. ते बघण्यासाठी अमाप गर्दी होत होती, मोबाइल फोनचे क्लिकक्लिकाट होत होते आणि त्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा हुरूपही वाढत होता.
आणखी वाचा-आधी सिद्धेश कदम यांची भेट अन् महिनाभरातच मर्सिडीज बेंझ अडचणीत!
पुण्याच्या गणेशोत्सवाने प्रबोधनाची कासही सोडलेली नाही. सदाशिव पेठेतील एका मंडळाने ‘मासिक पाळी’ या एरवी घरातही बोलायला अवघड वाटणाऱ्या विषयावर सोप्या, पण परिणामकारक भाषेत केलेली प्रबोधनात्मक मांडणी या दृष्टीने लक्षवेधक होती. कर्वे रस्त्यावरील एका मंडळाने राष्ट्रपती पुरस्कारविजेत्या महिला शिक्षिकेची घेतलेली दखल, काही मंडळांचे वैज्ञानिक देखावे आणि मध्यवर्ती पेठांबरोबरच भवानी पेठ, कॅम्प परिसर, गोखलेनगर, तसेच हडपसर, येरवडा, कोथरूड, सहकारनगर आदी उपनगरांतील मंडळांच्या उत्साहाचीसुद्धा नोंद घ्यायला हवी. पूर्व भागातील एका मंडळाने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना, त्यांच्या कारकिर्दीवर आधारित देखाव्यातून दिलेली मानवंदनाही अशीच वेधक. राजकीय भाष्य करणारे काही देखावेही औचित्यपूर्ण. या कल्पकतेला, कला-राजकारण-सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या जागलेपणाला आणि कष्टाळू वृत्तीला दाद द्यायलाच हवी.
एकीकडे दणदणाटाचा अतिरेक होत असताना, अजूनही शहरातील काहींना उत्सवाचे विधायक रूप टिकवून ठेवावेसे वाटते, हाच सध्या मोठा दिलासा आहे. सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिक साधन असलेल्या मेट्रोने भाविक लाखोंच्या संख्येने प्रवास करून देखावे पाहायला जातात, हा या शहराचा ‘डीएनए’ आहे, हे आपण लक्षात घेऊ. तंत्रज्ञान आणि मनोरंजन क्रांतीच्या काळात सगळेच एका क्लिकवर, हाताच्या पंज्यावर मावणारे असले, तरी महिनाभर आधी तयारी सुरू करून साकारलेले अनेक देखावे प्रेक्षकांची दाद घेऊन जातात, ही या उत्सवाची सामाजिक सहभागाची भावना आहे. हॅरी पॉटरपासून देशी छोटा भीमच्या अनेक करामती मनोरंजनाच्या पडद्याने सहजी उपलब्ध करून दिल्यानंतरही पौराणिक गोष्टींवर साकारलेले हलते देखावे, त्यातील पात्रांच्या शिल्पकृती कितीही ओबडधोबड असल्या, तरी पाहिल्या जातात, हा फक्त भाबडेपणा नाही. ती समाजात मिसळून, एकत्र येऊन अखेरीस समाजातीलच काहींनी निर्मिलेल्या निर्मितीला दाद देण्याची कृतज्ञ कृती आहे. हे एकदा समजले, की आवाजाने त्रास झाला, तरी यंदाच्या उत्सवात विक्रमी गर्दीही का झाली याचे उत्तर मिळवणे जरा सोपे होईल. हस्तिदंती मनोऱ्यातून त्यातील ही निरागसता लक्षात येणार नाही.
आणखी वाचा-पिंपरी : श्वान पथकाला मिळणार बळ; गुन्ह्यांची उकल करण्यास होणार मदत
याचा अर्थ सगळे छान चालले आहे, असा नाहीच. कुप्रवृत्तींवर अंकुश हवाच आणि शहराला वेठीस धरणाऱ्यांचे कान टोचायलाच हवेत. आणि याची जबाबदारी जितकी प्रशासनावर तितकी राजकीय नेतृत्वावरही आहे, याचेही भान सुटता कामा नये. गणेश मंडळांचे कार्यकर्ते हे भावी राजकीय कार्यकर्ते वा नेते असतील, तर त्यांना सुसंस्कृत दिशा देण्याचे काम आत्ताच्या नेत्यांचे आहेच. शहरातील विविध पक्षांत पुढे आलेले बहुतांश नेतृत्व गणेश मंडळांच्या कामांतूनच उभे राहिलेले आहे, त्यामुळे तर ही जबाबदारी आणखी मोठी. दुसरीकडे पुणे शहराचे सर्वंकष नेतृत्व करील, असा नेता आज शहराला नाही, ही वस्तुस्थिती बदलण्याचीही निकड आहेच. विशेषत: वाहतूक, प्रदूषण, गुन्हेगारी, बकालपणा, पर्यावरणाचा ऱ्हास अशा अनेक अंगांनी कधी काळच्या या सुसंस्कृत शहराचे स्खलन होत असताना ते निर्नायकी असणे म्हणजे बेबंदशाहीला निमंत्रण देणारे आहे. तसे होऊ नये असे वाटत असेल, तर सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वाने आपल्या कार्यकर्त्यांना कशाकशाची मोकळीक द्यायची, याचा एकदा विचार करावाच! अखेर, गणेशोत्सव हा अजूनही शहरवासीयांचा प्राणवायू आहे आणि तो संपल्यावर, विसर्जनादिवशी गणरायाला निरोप दिल्यावर मनात होणारी कालवाकालव अनुभवणारे अनेक पुणेकर या शहरात आहेत, हे लक्षात ठेवणे आणि ती जाणीव मरणार नाही, याची काळजी घेणे सगळ्यांच्याच भल्याचे.
siddharth.kelkar@expressindia.com