दरवर्षीच्या तुलनेत मिरवणूक सुसहय़; पाहणीतील निष्कर्ष

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादांचे उल्लंघन होऊन ध्वनिप्रदूषणाची पातळी चढीच राहिली. यंदाच्या मिरवणुकीतील आवाजाच्या पातळीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.५ टक्क्यांनी घट झाली. यंदाच्या मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादांचे उल्लंघन होऊन ध्वनिप्रदूषणाची पातळी चढीच असली, तरी वातावरण सुसहय़ असल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले.

यंदाच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवर न्यायालयाने घातलेल्या ध्वनिवर्धकबंदीचे सावट होते. ध्वनिवर्धकाच्या भिंती लावणाऱ्या मंडळांवर गुन्हा दाखल करण्याचा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला होता. न्यायालयाच्या बंदीच्या निर्णयावर मंडळांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. प्रत्यक्ष मिरवणुकीत मंडळांनी ध्वनिवर्धकांच्या भिंती लावल्याच; मात्र काही प्रमाणात घटही झाली. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाची पातळी गेल्या वर्षीच्या (९०.९ डेसिबल) तुलनेत यंदा ०.५ टक्क्यांनी कमी झाल्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील दहा प्रमुख चौकांमध्ये मोजलेल्या आवाजाच्या मोजणीतून दिसून आले. यंदाच्या मिरवणुकीत सरासरी ९०.४ डेसिबल आवाज नोंदवला गेला.

गेल्या अठरा वर्षांतील ही तिसरी नीचांकी आकडेवारी आहे. नागेश पवार, सतीश सुखबोटलावार, सुदेश राठोर, पंकज घोगरे, तुषार राठोड, आकाश रघतवान, वैभव नरवाडे, केतन साखरे, तुषार वाघिरे, विशाल भास्करे, सुदर्शन बद्धमवाड, जगन मोकमोड, प्रदीप तिडके, अनिकेत गजभिये, स्वप्नील धुलेवार, ओंकार कामाजी, मुरली कुंभारकर, प्रवीण शिवपुजे या विद्यार्थ्यांनी मिरवणूक काळात ध्वनिमापन केले.

‘आवाजाची पातळी साधारणपणे दिवसा ६५ डेसिबल आणि रात्री ५५ डेसिबल असणे अपेक्षित असते, मात्र वाहनांचे आवाज आणि अन्य कारणांमुळे एरवीही आवाजाची पातळी ७०च्या घरात असते. यंदाच्या मिरवणुकीत आवाजाच्या पातळीत फार फरक पडला नसला, तरी मिरवणुकीतील वातावरण बरेच सुसहय़ होते. काचा थरारणे, छातीत धडधड होणे असे प्रकार विशेष जाणवले नाहीत,’ असे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उपयोजित विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. महेश शिंदीकर यांनी सांगितले.

चौकनिहाय ध्वनीची पातळी (डेसिबलमध्ये)

  • बेलबाग चौक- ९१.४
  • गणपती चौक- ८९.९
  • लिंबराज महाराज चौक- ९३.७
  • कुंटे चौक- ९०.४
  • उंबऱ्या गणपती चौक- ९०.७
  • भाऊसाहेब गोखले चौक- ९३.४
  • शेडगे विठोबा चौक- ८९.०
  • होळकर चौक (गरुड गणपती)- ८७.३
  • टिळक चौक- ९२.९
  • खंडुजी बाबा चौक- ८५.२
  • सरासरी- ९०.४

प्रमुख निरीक्षणे

  • कार्यकर्ते, नागरिकांमध्ये ध्वनिप्रदूषणाबाबत जागृती झाली.
  • मोजणीदरम्यान एकमेकांशी बोललेले ऐकू येण्याइतपत चांगली स्थिती.
  • ढोलताशे आणि झांजांच्या एकत्रित वादनामुळे
  • आवाजाच्या पातळीत वाढ.
  • ध्वनिवर्धकाच्या भिंतींमुळे होणाऱ्या थरारात घट.

काही ठिकाणी वाढ; काही ठिकाणी घट

गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या आकडेवारीवरून काही चौकांतील आवाजाच्या पातळीत वाढ झाली, तर काही चौकांतील आवाजाच्या पातळीत घट झाल्याचे स्पष्ट झाले. बेलबाग ३.१, लिंबराज महाराज ४.०, भाऊसाहेब गोखले २.५, लोकमान्य टिळक ०.४, खंडुजी बाबा २.४ या चौकांमध्ये ध्वनिप्रदूषणात वाढ  झाली. तर गणपती चौक ०.१, कुंटेचौक ६.४, उंबऱ्या गणपती २.४, शेडगे विठोबा ४.२, होळकर ४.९ या चौकांमध्ये आवाजाच्या पातळीत घट झाली.