मराठी चित्रपट परिवारातर्फे देण्यात येणाऱ्या चित्रपदार्पण पुरस्कारांची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. यात सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी ‘सतरंगी रे’, ‘धग’, ‘श्री पार्टनर’ आणि ‘खेळ मांडला’ या चित्रपटांमध्ये चुरस आहे. या पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष असून यंदा ‘सतरंगी रे’ या चित्रपटाने सर्वाधिक दहा नामांकने पटकाविली आहेत.
सवरेत्कृष्ट दिग्दर्शनासाठी समीर सुर्वे (श्री पार्टनर), समीत कक्कड (आयना का बायना), संदेश कुलकर्णी (मसाला), शिवाजी पाटील (धग) यांच्यात चढाओढ आहे. सवरेत्कृष्ट अभिनेत्यासाठी पद्मनाभ बिंड (श्री पार्टनर) आणि सौमिल श्रृंगारपुरे (सतरंगी रे) यांना तर सवरेत्कृष्ट अभिनेत्रीसाठी उषा जाधव (धग), स्नेहा कुलकर्णी (येडय़ांची जत्रा) आणि श्वेता पगार (श्री पार्टनर) यांना नामांकने मिळाली आहेत. सवरेत्कृष्ट संगीतकारासाठी अजय नाईक (सतरंगी रे), क्षितिज वाघ (येडय़ांची जत्रा) आणि सिद्धार्थ- सौमिल (स्वप्न तुझे नि माझे) यांच्यात स्पर्धा आहे. या व्यतिरिक्त चित्रपटाची कथा, पटकथा व प्रसिद्धी विभागातही पारितोषिके देण्यात येणार आहेत. मराठीतील ‘नॉन फिल्मी म्युझिक अल्बम’ विभागात सवरेत्कृष्ट अल्बम, संगीतकार, गायक आणि गीतकार आदी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.