सामिष खवय्यांकडून धुळवड साजरी; मासळी बाजारात मोठी आवक

होळीच्या दुसऱ्याच दिवशी धुळवडीला गोडावर ‘उतारा ’ म्हणून अनेक जण घरोघरी सामिष पदार्थ करतात. सामिष पदार्थावर ताव मारून शुक्रवारी धुळवड साजरी करण्यात आली. धुळवडीच्या दिवशी मासळी, मटण तसेच चिकनला खवय्यांकडून मोठी मागणी राहिली.

धुळवडीच्या दिवशी सामिष पदार्थ तयार केले जातात, त्यामुळे मासळी बाजारात धुळवडीच्या दिवशी मोठी उलाढाल होते. मासळी, मटण तसेच चिकन खरेदीसाठी शुक्रवारी सकाळीपासून खवय्यांना गर्दी केली होती. गणेश पेठेतील मासळी बाजार, कसबा पेठ, भवानी पेठ, गंज पेठेतील मासळी बाजारात तसेच उपनगरातील विश्रांतवाडी, कोथरुडमधील पौड फाटा येथील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. यासंदर्भात गणेश पेठ मासळी बाजारातील प्रमुख विक्रेते ठाकूर परदेशी म्हणाले, मासळी बाजारात धुळवडीच्या दिवशी खोल समुद्रातील सात ते आठ टन, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सिलन या मासळीची दहा ते बारा टन, नदीतील मासळी सातशे ते आठशे किलो, खाडीतील मासळी १०० ते २०० किलो अशी आवक झाली. मासळीच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ झाली.

मागणीत मोठी वाढ

पुणे जिल्हा परिसरात मोठय़ा पोल्ट्री व्यावसायिकांकडून कोंबडी बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात. बाजारात जिवंत पक्ष्यांची आवक केली जाते. त्यांना लाइव्ह बर्ड्स म्हणतात. साधारणपणे पुणे शहर परिसरात साडेसातशे टन चिकनची आवक बाजारात झाली आहे. धुळवडीच्या दिवशी चिकनच्या मागणीत चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे. धुळवडीच्या दिवशी चिकनला घरगुती ग्राहकांकडून अधिक मागणी असते. चिकनचा प्रतिकिलोचा दर १३० रुपये असा राहिला, असे शीतल अ‍ॅग्रोचे रूपेश परदेशी यांनी सांगितले.

मटण विक्री बेताची

धुळवडीनिमित्त मटणाला बेताची मागणी राहिली. दहावीच्या परीक्षा तसेच सलग सुट्टय़ांमुळे मटण विक्रीवर परिणाम झाला. बोकड आणि बोल्हाईच्या मटणाचा प्रतिकिलोचा दर ४६० रुपये असा राहिला, असे मटण विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

Story img Loader