लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: शहरात विनापरवाना मोठे लोखंडी जाहिरातफलक (होर्डिंग) मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आल्याची कबुली महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरात २ हजार ६२९ अनधिकृत फलक असून, अनधिकृत फलकांची संख्या अधिकृत जाहिरातफलकांपेक्षा जास्त आहे. अनधिकृत फलकांची संख्या जास्त असतानाही गुन्हे दाखल करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून केवळ पत्र देण्यात आली आहेत. त्यामुळे अनधिकृत जाहिरात फलकांवरील कारवाई निव्वळ फार्स असल्याचे स्पष्ट झाले आहे.

किवळे येथील अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत होर्डिंगबाबतची माहिती घेतली असता विनापरवाना अनधिकृत फलक असतानाही त्यांच्याकडे कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाची डोळेझाक होत असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील अनधिकृत जाहिरातफलकांचा मुद्दा सातत्याने पुढे आला आहे. अनधिकृत जाहिरातफलक उभारणीला लगाम घालण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून काही महिन्यांपूर्वी धोरण करण्यात आले. जाहिरातफलक उभारण्यासाठी आकाशचिन्ह आणि परवाना विभागाची मान्यता घेणे बंधनकारक आहे. मात्र परवानगी न घेताच फलकांची उभारणी केली जात असल्याचे वेळोवेळी पुढे आले आहे. महापालिकेच्या मुख्य सभेतही त्या संदर्भात प्रशासनाचा खोटेपणा उघड झाल्यानंतर शहरातील अनधिकृत जाहिरातफलकांची संख्या शंभरच्या आत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत होता. मात्र आता आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने शहरात अडीच हजारांहून अधिक अनधिकृत जाहिरातफलक असल्याची कबुली दिली आहे.

आणखी वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये ४३४ अनधिकृत होर्डिंग, धोरणाची अंमलबजावणी प्रलंबित

शहरातील अनधिकृत जाहिरातफलकांची संख्या महापालिका अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळेच वाढत आहे. कुठला जाहिरातफलक अनधिकृत आहे, याची माहिती असतानाही त्याकडे सातत्याने डोळेझाक करण्यात येते. केवळ नोटीस बजाविण्याची जुजबी कारवाई प्रशासनाकडून होत होती. मात्र जाहिरातफलकांबाबत सर्वेक्षण करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर गेल्या महिन्यापासून आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून सर्वेक्षण सुरू केले होते.

क्षेत्रीय स्तरावर सर्वेक्षण सुरू असून, त्यानुसार अनधिकृत जाहिरातफलक पाडण्याची कारवाई सुरू झाली आहे. सध्या २ हजार ६२९ अनधिकृत जाहिरातफलक असून, अधिकृत जाहिरात फलकांची संख्या २ हजार ४८५ एवढी असल्याची माहिती महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

आणखी वाचा-पुणे जिल्ह्यातील ‘या’ बारा शाळा अनधिकृत ; जिल्हा परिषदेकडून यादी प्रसिद्ध

गेल्या वर्षी एक एप्रिलपासून १७ एप्रिलपर्यंत त्यापैकी ९५३ अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात १ हजार ६७६ एवढेच अनधिकृत जाहिरातफलक असल्याचा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे. अनधिकृत जाहिरातफलक उभारल्याप्रकरणी ५०८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनधिकृत जाहिरातफलक- २६२९
अधिकृत जाहिरातफलक- २४८५
अनधिकृत जाहिरात फलकांवरील कारवाई – ९५३
दंडवसुली- ७४,९७,६०० रुपये

धोरण कागदावरच

मालधक्का चौकात जाहिरातफलक कोसळल्याची घटना घडल्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अनधिकृत जाहिरात फलकांबाबतचे धोरण तयार केले. मात्र धोरणाची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे. या धोरणामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. त्यानुसार निष्कासन कारवाईचा खर्च संबंधित अनधिकृत जाहिरात फलकधारकाकडून वसूल करण्याचा, तसेच वारंवार नोटीस देऊनही प्रतिसाद न दिल्याबद्दल मिळकतकरामध्ये त्याचा बोजा चढविण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाईही धोरण प्रस्तावित आहे. त्यानुसार महापालिका सहायक आयुक्तांनी ४९३ पत्रे पोलिसांना दिली आहेत, तर थकबाकीच्या रकमेच्या वसुलीसाठी मिळकतकरावर बोजा चढविण्यासंदर्भात १७३ पत्रे करआकारणी आणि करसंकलन विभागाला देण्यात आली आहेत.

Story img Loader