पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांचे कथित दांडी प्रकरण प्रत्यक्षात फुसका बार ठरले असून एकही नगरसेवक अपात्र ठरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचा लेखी अहवाल नगरसचिव विभागाने महापौर मोहिनी लांडे व आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना दिल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे.
पिंपरी पालिकेतील काही नगरसेवक सर्वसाधारण सभांना सातत्याने गैरहजर राहत असल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले होते. सलग तीन सभांना गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवून पालिकेतील सात नगरसेवकांना दांडी प्रकरण भोवणार व त्यांचे पद जाणार असल्याचे दावे करण्यात आले होते. त्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले. त्या नगरसेवकांचे प्रतिस्पर्धी तसेच पराभूत उमेदवार कामाला लागले. काहींनी माहिती अधिकारात अर्ज दाखल केले. यापूर्वी अशाप्रकारे दांडीबहाद्दर नगरसेवकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे दांडय़ा मारणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईची मागणी होऊ लागली. आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले व तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश नगरसचिव विभागाचे प्रमुख दिलीप गावडे यांना दिले. त्यानुसार, याबाबतची सविस्तर माहिती घेत गावडे यांनी अहवाल तयार केला. तेव्हा हा सगळा प्रकार फुसका बार असल्याचे उघड झाले. एकही नगरसेवक सलग तीन सभांना गैरहजर राहिला नव्हता, त्यामुळे कोणाला अपात्र करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. काही नगरसेवक तहकूब सभांना गैरहजर राहत असले, तरी नियमित सभांना त्यांची हजेरी असल्याचे हजेरीपुस्तकांवरून दिसून आले आहे. हजेरीपुस्तकांवरील सह्य़ा ‘मॅनेज’ करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगत केवळ हजेरीपुस्तक हा पुरावा नसून सभावृत्तान्त तयार करणारा विभाग व सभाभत्ता देणारी यंत्रणा एकाच वेळी सभागृहातील उपस्थितीची नोंद ठेवत असते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. महापौर लांडे व गावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती पत्रकारांना दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा