‘‘राजाभाऊंनी नुसते चांगले चित्रपट निर्माण केले नाहीत, तर खूप चांगले कलावंत निर्माण केले. चित्रपटाची पाश्र्वभूमी नसतानाही माणसातील कलावंत हेरून त्याला घडवण्याचे काम त्यांनी केले,’’ असे मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी ‘राजा माणूस’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात रविवारी व्यक्त केले.
राजा परांजपे यांच्या जीवनावरील अनिल बळेल लिखित ‘राजा माणूस’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाला. स्नेहल प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, शाहू मोडक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रतिभा शाहू मोडक, लेखक अनिल बळेल, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे उपस्थित होते.
रमेश देव, राजदत्त यांचे अनुभव, ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके, राजा परांजपे यांच्या किस्स्यांच्या उपस्थितांनी सांगितलेल्या आठवणी यातून राजा परांजपे हे व्यक्तिमत्त्व रसिकांसमोर उलगडत गेले. यावेळी राजदत्त म्हणाले, ‘‘ओल्या मातीला आकार देता येतो, पण कोरडय़ा मातीला किंवा धुळीला आकार देण्याची जादू राजाभाऊंनी केली. चित्रपट क्षेत्राची काहीही पाश्र्वभूमी नसताना मी आज आहे, त्याचे श्रेय हे राजाभाऊंचे आहे. ते कलाकार म्हणून थोर होतेच, पण माणूस म्हणूनही मोठे होते.’’
रमेश देव म्हणाले, ‘‘राजा परांजपे यांना ‘राजा माणूस नाही, तर देव माणूस म्हटले पाहिजे. ‘राजा’ ही उपाधी त्यांच्यासाठी खूप लहान आहे, ते त्यापेक्षा खूप मोठे होते. त्यांना रसिकांचे प्रेम मिळाले पण प्रसिद्धी मिळाली नाही. त्यांची दिग्दर्शनाची पद्धत, शिकवण्याची पद्धत ही अलौकिक होती.’’