जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मंगळवारी एक अजब निकाल लागला. म्हाकोशी गावात विजयी उमेदवारापेक्षा नोटाला अधिक मते पडली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाचा दाखला देत नोटाच्या खालोखाल मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या रेखा साळेकर या विजयी झाल्या.
भोरमधील म्हाकोशी गावात प्रभाग क्रमांक एकमध्ये हा निकाल लागला. या प्रभागात सर्व साधारण महिलांसाठी दोन जागा आरक्षित होत्या. त्याकरिता तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. विजयासाठी तिन्ही उमेदवारांनी प्रचार केला. मतदानाच्या दिवशी ३४० मतदारांनी मतदान केले. संगीता तुपे यांना १२३ मते मिळाली आणि दोन पैकी एका जागेवर त्यांचा विजय निश्चित झाला. त्यानंतर दुसऱ्या उमेदवाराच्या जागेसाठी नोटाला १०४, तर साळेकर यांना ४३, तर कविता शेडगेंना ४२ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाचा दाखला देत नोटा पर्यायाला मिळालेल्या मतांची संख्या लक्षात न घेता त्याखालोखाल सर्वाधिक मते मिळालेल्या साळेकर यांना विजयी घोषित केले.