ग्राहकाने वापरलेल्या विजेचा पुरेपूर मोबदला वसुलीचा अधिकार वीज पुरवठादार महावितरण कंपनीला असला, तरी वीज कायद्याचा भंग करून वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांवर वीजपुरवठा तोडण्याची कारवाई होत असल्याच्या विविध तक्रारी पुढे येत असतात. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांच्याबाबतीतच असा प्रकार घडल्याने अधिकाऱ्यांना त्यांना भेटून दिलगिरी व्यक्त करावी लागली. मात्र, या प्रकरणामुळे महावितरणला चांगलाच झटका बसला असून, वीजबिलाची रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांना वीजपुरवठा तोडण्यापूर्वी नोटीस देण्यात येत असल्याबाबतचा अधिकृत उल्लेख वीजबिल भरण्याबाबत केलेल्या आवाहनात करण्यात आला आहे.
आर्थिक वर्षांचा शेवटचा महिना असल्याने वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याची जोरदार कारवाई महावितरणकडून या महिन्यात करण्यात येत आहे. वीजबिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीजपुरवठा तोडायचा असल्यास वीज कायद्यानुसार संबंधिताला पंधरा दिवसांची नोटीस देणे बंधनकारक आहे. त्याशिवाय वीज तोडण्याची कारवाई करता येत नाही. संबंधित थकबाकीदाराने नोटीस दिल्यानंतरही पंधरा दिवसात वीजबिल भरले नाही, तर त्याचा वीजपुरवठा खंडीत करता येतो व तो पुन्हा पूर्ववत करण्यासाठी अतिरिक्त शुल्कही आकारण्याचा अधिकार महावितरण कंपनीला आहे. मात्र, कायद्यानुसार अशा प्रकारची कोणतीही नोटीस न देताच थकबाकीदाराचा वीजपुरवठा तोडण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.
ग्राहकाला दिलेले वीजबिल हीच नोटीस असते, असे काही अधिकाऱ्यांकडून पूर्वी सांगितले जात होते. अशा प्रकारची कोणतीही नोटीस नसते, अशी उत्तरेही ग्राहकांना स्थानिक कर्मचाऱ्यांकडून दिली जात होती. मात्र, वीजबिलाच्या यंत्रणेनुसार एखाद्या महिन्यात संबंधिताने वीजबिल न भरल्यास दुसऱ्या महिन्याच्या बिलासोबत त्याला नोटीस जाणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्यानेच कायद्याचा भंग होत असल्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. या नोटिशीबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने बोलणे टाळले जात होते. पण, माधव गाडगीळ यांच्याबाबत झालेल्या प्रकरणानंतर या प्रश्नाला वाचा फुटली. गाडगीळ यांनी त्यांच्या नावावरील वीजजोडाचे बिल भरूनही त्यांना नोटीस देण्यात आली, तर त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या वीजजोडाचेही बिल भरले असताना कोणतीही नोटीस न देताच वीजपुरवठा तोडण्यात आला होता. ही चूक लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त केली. मुख्य म्हणजे त्यातून संबंधित यंत्रणाही खडबडून जागी झाली.
कोणत्याही थकबाकीदाराचा वीजपुरवठा तोडण्यापूर्वी संबंधिताला नोटीस देण्याबाबत सध्या लक्ष पुरविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वीजबिल भरण्याबाबत महावितरणने केलेल्या आवाहनामध्येही नोटीस देत असल्याबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे आतातरी कारवाई करताना कायद्याच्या पालनातून ग्राहकांना होणारा नाहक त्रास टळू शकणार असल्याची अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
काय आहे ‘महावितरण’चे आवाहन?
वीजबिले मुदतीत भरण्याबाबत महावितरणच्या पुणे परिमंडलाकडून ग्राहकांना आवाहन करण्यात येत असून, त्याबाबत निवेदनही प्रसिद्धीस देण्यात आले आहे. त्यात म्हटल्यानुसार, सद्यस्थितीत महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यात येत आहे. तथापि, चालू वीजबिलांची मुदत संपल्यानंतर बिलाचा भरणा न केलेल्या वीजग्राहकांकडे पाठपुरावा सुरू आहे. मुदत संपल्यानंतरही चालू वीजबिलाचा भरणा न केलेल्या वीजग्राहकांकडे जाऊन त्यांना बिल भरण्याबाबत जनमित्रांकडून विनंती करण्यात येत आहे. याशिवाय मुदतीत वीजबिल न भरल्याने संबंधित ग्राहकांना नोटीस देण्यात येत आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू वीजबिलांचा मुदतीत व मागील महिन्यातील थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे. वीजबिलाबाबत काही तक्रार असल्यास महावितरणच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधल्यास तक्रारीचे निवारण करण्यात येईल. ग्राहकांसाठी महावितरण संकेतस्थळाच्या माध्यमातून व मोबाइल अॅपद्वारे वीजबिल भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा