पुणे : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील आस्क केमिकल्स कंपनीने हवा आणि जलप्रदूषण केल्याची बाब समोर आली आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे. कंपनीला उत्पादन बंद करण्याची नोटीस मंडळाने मंगळवारी बजाविली.
आस्क केमिकल्स कंपनीकडून पर्यावरण नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आल्या होत्या. यानंतर मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी कंपनीला भेट देऊन तपासणी केली होती. या तपासणीवेळी अनेक नियमांचे उल्लंघन समोर आले होते. त्यानंतर कंपनीला नियमांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मंडळाने निर्देश देऊनही कंपनीने त्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे अखेर मंडळाने कंपनीला नोटीस बजावून उत्पादन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा >>>शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे नाशिकसाठी गौरवास्पद – पालकमंत्री दादा भुसे यांची भावना
मंडळाने म्हटले आहे की, आधी सूचना देऊनही आस्क केमिकल्स कंपनीने नियमांचे पालन केले नाही. कंपनीने मेल्झर केमिकल या कंपनीचा कच्चा माल आपल्या आवारात साठवून ठेवला होता. तो दुसरीकडे हलविण्यास सांगूनही तो हलविण्यात आला नाही. याचबरोबर आस्क केमिकल्स कंपनीने तिच्याकडील २० एकर जागेपैकी काही जागा मेल्झर केमिकल कंपनीला कच्चा माल साठवून ठेवण्यासाठी दिली. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेण्यात आली नव्हती.
मंडळाने कंपनीला ३१ मेपर्यंत उत्पादन सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. ही मुदत संपल्यानंतरही कंपनीकडून उत्पादन सुरू आहे. त्यामुळे कंपनीने उत्पादन तातडीने थांबवावे. कंपनीकडून हवा आणि जलप्रदूषण झाले आहे. पुढील परवानगी मिळाल्याशिवाय कंपनीने उत्पादन सुरू करू नये. याचे उल्लंघन केल्यास कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
आस्क केमिकल्स कंपनीने हवा, जलप्रदूषण केले आहे. याचबरोबर परवानगीची मुदत उलटून गेल्यानंतरही कंपनीकडून उत्पादन सुरू होते. त्यामुळे उत्पादन थांबविण्याची नोटीस कंपनीला देण्यात आली आहे. या कंपनीचा वीज व पाणीपुरवठा थांबविण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.- जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ