पिंपरी : शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी खाण्यासाठी बाहेरून पिझ्झा मागविल्याने संबंधित विद्यार्थिनींना वसतिगृहामधील प्रवेश एक महिन्यासाठी रद्द करण्यात येईल, अशी नोटीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून बजावण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे हा प्रकार समोर आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथील संतनगरमध्ये स्पाईन रोड येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह आहे. एका खोलीत चार विद्यार्थिनी याप्रमाणे २५० विद्यार्थिनी या वसतिगृहात आहेत. यातील एका खोलीतील विद्यार्थिनींनी बाहेरून पिझ्झा मागवून खाल्ला, असे वसतिगृहाच्या प्रमुखांचे म्हणणे आहे.
संबंधित चार विद्यार्थिनींना याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. यात सहा फेब्रुवारी २०२५ रोजी बजावण्यात आलेल्या नोटिसीनुसार, ३० जानेवारी रोजी केलेल्या पाहणीत वसतिगृहातील एका खोलीत पिझ्झाचा बॉक्स निदर्शनास आला. खोलीतील विद्यार्थिनींनी बाहेरून पिझ्झा आणून खाल्लेला आहे. बाहेरील खाद्य पदार्थ वसतिगृहातील आपल्या खोल्यांमध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. तसेच संबंधित विद्यार्थिनींना यापूर्वी याबाबत सूचित केलेले असतानाही त्यांनी वसतिगृहात नियमबाह्य वर्तन केले. याबाबत संबंधित चौघींकडे चौकशी केली असता त्यांनी ही बाब नाकारली. चौघींपैकी कोणी बाहेरून पिझ्झा आणला आहे, हे मान्य करत नाहीत. दोन दिवसांत ८ फेब्रुवारीपर्यंत चौघींपैकी कोणी बाहेरून पिझ्झा वसतिगृहात आणलेला आहे हे मान्य करावे अन्यथा चौघींचाही एक महिन्याकरिता वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्यात येईल, असे वसतिगृहाच्या प्रमुखांनी दिलेल्या नोटिसीत नमूद आहे.
याप्रकरणी गृहप्रमुखांकडून आम्हाला तीन नोटीस देण्यात आल्या. मी वसतिगृहात बाहेरून पिझ्झा आणून खाल्ला नाही. तरीही नोटीस देण्यात येत आहे. यातून मला मानसिक त्रास होत असल्याचे संबंधित विद्यार्थिनीने म्हटले आहे. तर, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी समाज कल्याणचे विभागीय आयुक्त व सहआयुक्तांकडे केली आहे. स्वतःचे नियम बनवून विद्यार्थिनींवर अन्याय करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच संबंधित विद्यार्थिनींना यापुढे त्रास होऊ नये म्हणून वसतिगृह बदलून द्यावे, असे स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड संघटनेचे अध्यक्ष ॲड. कुलदीप आंबेकर म्हणाले.
वसतिगृहातील मुलींचे आरोग्य बिघडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे वसतिगृहात बाहेरचे खाद्यपदार्थ आणून खाण्यास मनाई आहे. बाहेरून आणून खाल्लेल असल्यास संबंधित मुलींनी चूक मान्य करावी आणि इतर मुलींना शिस्त लागावी यासाठी समज म्हणून नोटीस दिली आहे. कोणत्याही मुलींना वसतिगृहातून काढलेले नाही. त्यांचा प्रवेश रद्द केलेला नाही, असे मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहप्रमुख मिनाक्षी नरहरे यांनी सांगितले.