बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाला (बीएमसीसी) प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उच्च शिक्षण सहसंचालकांनी नोटिस बजावली आहे. त्यामुळे महाविद्यालयाने राबवलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्वायत्त असलेल्या बीएमसीसीकडून प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवताना सामायिक प्रवेश परीक्षेबरोबरच दहावीच्या गुणांना महत्त्व देण्यात आले. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत नियमांचे पालन न झाल्याचा आक्षेप घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश खुरपे, अखिल भारतीय सेनेचे उल्हास अग्निहोत्री, वंचित बहुजन आघाडीचे अतुल झोडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमरजित पबमे आदींनी विद्यापीठाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर विद्यापीठाकडून खुलासा मागवण्यात आला होता. तसेच या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या मागणीनुसार दहा टक्के वाढीव जागांना विद्यापीठाकडून नकार देण्यात आला.
या पूर्वीच्या पत्रानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली नसल्यास सदर विद्यार्थ्यांची पात्रता ग्राह्य धरता येणार नाही असे विद्यापीठाने महाविद्यालयाला पाठवलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगाची अधिसूचना, शासनाचे स्वायत्त महाविद्यालयांतील एकरूप परिनियम प्रवेश प्रक्रियेचे निकष या बाबी नमूद करून आपले म्हणणे आठ दिवसांत संचालनालयाला सादर करण्याबाबत उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, विद्यापीठ आणि उच्च शिक्षण सहसंचालक यांच्याकडे प्रवेश प्रक्रियेबाबतची बाजू मांडत असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांनी सांगितले.