लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी: जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणानंतर तळेगाव दाभाडे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासंदर्भात विविध प्रसारमाध्यमांच्या स्थानिक पत्रकारांना नोटीस बजावली आहे. घडलेल्या घटनेचे योग्य रीतीने वार्तांकन केले जात असतानाही पोलिसांनी नोटिसा दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

किशोर आवारे (वय ४८) यांचा तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आवारात १२ मे रोजी सहा जणांच्या टोळक्याने निर्घृण खून केला. आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे (वय ६९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार शेळके यांनीच कट रचल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आल्याने घटनेचे गांभीर्य वाढले. मात्र, पोलीस तपासात वेगळाच प्रकार समोर आला. वडिलांच्या कानशिलात लगावल्याने झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील माजी नगरसेवकाच्या मुलानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने किशोर आवारे यांचा खून केल्याचे समोर आले.

खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गौरव चंद्रभान खळदे (वय २९) याच्यासह सहा जणांना पोलिसांनी गजाआड केले. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. गेल्या आठवडाभरातील या सर्व घडामोडींचे पत्रकारांकडून योग्यरीत्या, कायद्याची चौकट पाळून वार्तांकन केले जात आहे. मात्र, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत स्थानिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त चौबे यांच्याशी सातत्याने संपर्क केला. पण, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

काय आहे नोटीस?

फौजदारी दंड प्रक्रिया १९७३ च्या कलम १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या खून प्रकरणामुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस आयुक्तांनी १५ मे रोजी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. परंतु, समाजात कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण होईल, अशी बातमी प्रसारित करू नये. प्रसारमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे शांतता व कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्यास प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, भविष्यात ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून वापरण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

एखाद्या बातमीमुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरातील पाच ते सहा प्रसारमाध्यमांच्या स्थानिक प्रतिनिधींना नोटीस बजावण्यात आली आहे. -सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notice to journalists from talegaon dabhade police pune print news ggy 03 mrj