पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांना सावरकांचे नातू सात्यकी सावरकर यांनी नोटीस बजावली आहे. याबाबत रावयांनी पंधरा दिवसात जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सावरकर यांनी स्पष्ट केले.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर गोहत्येच्या विरोधात नव्हते. त्यांचे विचार मूलतत्ववादी होते’, असे अवमानकारक वक्तव्य कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी केले होते. त्यानंतर सावरकर यांचे नातू सात्यकी यांनी त्यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांच्या मार्फत गुंडू राव यांना नोटीस बजावली आहे. अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांनी जाहीर माफी, पंधरा दिवसांच्या सार्वजनिक खुलासा करावा. अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे गुंडू राव यांनी पाठविलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>विकसित भारतासाठी सहकार क्षेत्र का महत्वाचे? माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं कारण…

गुंडू राव यांनी कर्नाटकात पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सावरकर यांची महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना यांच्याशी तुलना केली होती. या कार्यक्रमात गुंडू राव यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यांच्या बेजबाबदार आणि निराधार विधानांमुळे सावरकरांची प्रतिमा मलिन झाली आहे. सावरकर प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. गुंडू राव यांनी केलेले विधान त्यांचे व्यक्तिगत आहे का ? तसेच संबंधित वक्तव्य, विचार ही काँग्रेसची भूमिका आहे का ? याचाही खुलासा त्यांनी करावा, असे गुंडू राव यांनी नोटिशीत म्हटले आहे.

दरम्यान, लंडन येथील अनिवासी भारतीयांच्या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पुण्यातील विशेष न्यायालयात सात्यकी सावरकर यांनी दावा दाखल केला होता. याप्रकरणी गांधी यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.