पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांकडून वेळेचे उल्लंघन होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून सोमवारी १५७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या. वेळेत कार्यालयात न आल्याने ही नोटीस बजाविण्यात आली आहे.

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!

हेही वाचा <<< खडकवासला, पानशेत धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार

महापालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, यासाठी महापालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी परिपत्रक जारी केले होते. मात्र त्यानंतरही कार्यालयीन वेळेची शिस्त अनेक कर्मचाऱ्यांकडून पाळली जात नसल्याने सोमवारी कारवाईचा बडगा उचलण्यात आल्या. कार्यालयात उशिरा आलेल्या १५७ कर्मचाऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली. कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित रहातात की नाही, हे पाहण्यासाठी सामान्य प्रशासन आणि सुरक्षा रक्षक विभागातील कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले होते. कार्यालयीन वेळेचे पालन न करणे, कार्यालयीने वेळेत आवारात घुटमळणे, कामकाजाकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार कर्मचाऱ्यांकडून होत आहेत. कामचुकार कर्मचाऱ्यांना पहिल्या वेळी नोटीस देण्यात येणार आहे. नोटिशीला दोन दिवसांत खुलासा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सलग तीन वेळा वेळेचे पालन झाले नाही तर कर्मचाऱ्यांची एक हक्काची रजा रद्द करण्यात येणार आहे. तसेच वारंवार उशीर केल्यास एका दिवसाचे वेतन कमी केले जाणार आहे. यापुढे ही कारवाई तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.