महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या नाटय़गृहांमध्ये आता केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. नाटय़गृहाच्या ८० टक्के तारखा या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तर, खासगी कार्यक्रमांसाठी २० टक्के तारखा देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मान्य केला आहे.
चौमाही वाटपामध्ये मिळालेल्या नाटय़गृहांच्या तारखा अचानकपणे काढून घेतल्या जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्याबाबतीत हा अनुभव वारंवार येत होता. यासंदर्भात महापालिका प्रशासनाशी वारंवार चर्चा करूनही तोडगा निघत नसल्याने अखेरीस नाटय़निर्माते, व्यवस्थापक यांनी नुकतेच धरणे आंदोलन केले. या पाश्र्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी नाटय़निर्माते आणि व्यवस्थापकांशी चर्चा केली. त्यामध्ये महापालिका नाटय़गृहांमध्ये ८० टक्के सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वेळ राखीव ठेवण्याचा प्रस्ताव जगताप यांनी मान्य केला. मात्र, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल यांचा सहभाग असलेले केंद्र आणि राज्य सरकारचे कार्यक्रम किंवा महापालिकेचा कार्यक्रम असेल तरच नाटकाची तारीख काढून घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, गणेश कला क्रीडा मंच या नाटय़गृहांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मात्र, बालगंधर्व रंगमंदिरामध्ये तारखा काढून घेण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे खासगी कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाते, याकडे जगताप यांचे लक्ष वेधण्यात आले. अरुण बोंगिरवार हे आयुक्तपदी असताना २४ जून १९८५ रोजी स्थायी समितीने नाटय़गृहांच्या तारखांसंदर्भात केलेल्या ठरावाची अंमलजबावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. महात्मा फुले सभागृह आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह या नव्या नाटय़गृहांमध्ये सेवकवर्गाची नियुक्ती करावी आणि भाडे निश्चित करून ही नाटय़गृहे लवकर सुरू करावीत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त सुनील केसरी, रंगमंदिराचे मुख्य व्यवस्थापक भारत कुमावत यांच्यासह नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, दीपक रेगे, सुनील महाजन, नाटय़निर्माता संघाच्या अध्यक्षा भाग्यश्री देसाई, मेघराज राजेभोसले, मोहन कुलकर्णी, समीर हंपी, प्रवीण बर्वे, शिरीष कुलकर्णी आणि नाना मोहिते या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा