पुणे ः खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात ८५६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘मोक्का पॅटर्न’, २१ टोळ्यांतील २०९ गुन्हेगार गजाआड
हेही वाचा – ‘कसब्या’चा धडा घेऊन भाजप शहराध्यक्षांची निवड
खडकवासला धरण मंगळवारी पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे या धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, बुधवारी या धरणाच्या परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातून नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग बुधवारी दुपारी बंद करण्यात आला होता. मात्र, बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे गुरुवारी दुपारी एक वाजल्यापासून ४२८ क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. दुपारी तीन वाजल्यापासून हा विसर्ग ८५६ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये, तसेच नदीकाठालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून नवीन मुठा कालव्याद्वारे १००५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.