पत्रकारिता, साहित्य, नाटय़ व राजकारणाच्या क्षेत्रात लीलया संचार करणारे आचार्य प्र. के. अत्रे यांनी लिहिलेली सुमारे शंभर पुस्तकेही आता केवळ ५० रुपयांत उपलब्ध होणार आहेत. या पुस्तकांच्या हक्कांसाठी कोल्हापूर येथील ‘अजब’ पुस्तकालयाने तब्बल एक कोटी रुपये मोजल्याची चर्चा सध्या मराठी प्रकाशनविश्वात चवीने चर्चिली जात आहे. ‘अजब’ च्या संचालकांनीही, अत्रेंच्या पुस्तकांसाठी चार-सहा महिन्यांपासून बोलणी सुरू असल्याचे सांगितले, मात्र त्यासाठीचा चर्चिला जाणारा एक कोटी रुपयांचा आकडा हा अतिरंजित असल्याचे स्पष्ट केले. अत्रे यांची साहित्यसंपदा विपुल आहे. त्यात ‘कऱ्हेचे पाणी’ हे पाच खंडांतील आत्मचरित्र, ‘झेंडूची फुले’ हा कवितासंग्रह, भाषणांचे संग्रह, ‘तो मी नव्हेच’, ‘लग्नाची बेडी’, ‘मोरूची मावशी’, ‘साष्टांग नमस्कार’ अशी अनेक गाजलेली नाटके यांचा समावेश आहे. ही पुस्तके आतापर्यंत मुख्यत: परचुरे, मनोरमा प्रकाशन, डिंपल पब्लिकेशन आणि इतर काही प्रकाशकांनी प्रकाशित केली आहेत. या सर्व पुस्तकांची संख्या शंभरच्या आसपास आहे. ही सर्वच पुस्तके पुन्हा प्रकाशित करण्यासाठी कोल्हापूर येथील ‘अजब पुस्तकालय’ यांची अत्रे यांच्या वारसांशी गेल्या चार-सहा महिन्यांपासून बोलणी सुरू आहेत. ही सर्व पुस्तके मिळविण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यापैकी काही पुस्तके उपलब्धच नाहीत, तर काही केवळ ग्रंथालयांमध्ये आहेत. त्यांच्या प्रती तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.
स्वामित्त्वहक्कापोटी एक कोटी?
अत्र्यांच्या सर्व पुस्तकांच्या हक्कांसाठी ‘अजब’ने तब्बल एक कोटी रुपयांचा व्यवहार केल्याची जोरदार चर्चा सध्या मराठी प्रकाशनविश्वात आहे. मेहता पब्लिकेशनने शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ चे हक्क घेण्यासाठी मोठी रक्कम मोजल्याचे उदाहरण ताजे असतानाच अत्र्यांच्या साहित्यहक्कांच्या चर्चेने प्रकाशनविश्व अचंबित झाले आहे.
याबाबत ‘अजब’ चे शीतल मेहता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, अत्रेंच्या वारसांबरोबर व्यवहाराची बोलणी सुरू असल्याचे सांगितले. ‘‘अत्रेंची जितकी पुस्तके उपलब्ध होतील ती सर्व प्रकाशित करणार आहोत. या सर्वच पुस्तकांची किंमत प्रत्येकी पन्नास रुपये इतकी असेल. तसे करताना त्यातील कोणताही मजकूर कमी केला जाणार नाही. त्यामुळे सध्या ‘कऱ्हेचे पाणी’ चे पाच खंड १३५० रुपयांना आहेत, ते नंतर २५० रुपयांना उपलब्ध होतील. याबाबतचा तपशील करार झाल्यानंतर आपण जाहीर करू. मात्र, त्यासाठी काही काळ लागेल.’’
‘‘पुस्तकांची किंमत इतकी कमी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यासाठी १ कोटी रुपये देणे अशक्य आहे. इतकी रक्कम दिले जाणार असल्याची चर्चा ही इतरांनी पसरवलेली अफवा आहे,’’ असेही मेहता यांनी सांगितले.