वाहनाच्या एकाच नोंदणी क्रमांकासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अनेकांची मागणी आल्यास हा क्रमांक आता लिलाव करून जास्तीत जास्त रक्कम मोजणाऱ्याला देण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. संबंधित क्रमांकासाठी कुणी किती रक्कम दिली, ही बाब मात्र क्रमांक मिळेपर्यंत गुपित ठेवण्यात येणार आहे. पुणे ‘आरटीओ’मध्ये दुचाकीच्या क्रमांकाची नवी मालिका सुरू होणार असून, या प्रक्रियेत लिलावाची पद्धती अवलंबली जाणार आहे.
वाहनांना आकर्षक व पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार काही रक्कम आकारण्यात येते. आकर्षक क्रमांक घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने त्यातून शासनाच्या महसुलातही भर पडते आहे. काही वेळेला एकाच क्रमांकासाठी अनेकांचे अर्ज येतात. त्यातून एकाला तो क्रमांक देण्यासाठी पूर्वी इच्छुकांच्या नावाच्या चिठ्ठय़ांमधून एक चिठ्ठी काढून त्याला तो क्रमांक दिला जात होता. मात्र, आता अशा परिस्थितीत लिलाव पद्धत अवलंबण्यात येणार आहे.
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त लोकांचे अर्ज आल्यास या अर्जदारांना आता संबंधित क्रमांकासाठी ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये आरटीओ कार्यालयात जमा करावा लागणार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी व संबंधित अर्जदार यांच्या उपस्थितीत हे लिफाफे उघडण्यात येतील. त्यात जास्तीत जास्त रकमेचा डीडी दिलेल्या अर्जदाराला संबंधित क्रमांक देण्यात येईल.
दुचाकी वाहनांसाठी नवी मालिका सुरू होणार असल्याने पसंतीच्या क्रमांकासाठी २६ नोव्हेंबरला आरटीओकडे अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रही द्यावे लागणार आहेत. एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास त्याची यादी २७ नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता कार्यालयातील सूचना फलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांनी जास्तीत-जास्त रकमेचा डीडी जमा करायचा आहे. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी साडेचार वाजता डीडीचे बंद लिफाफे फोडून जास्तीत-जास्त रक्कम देणाऱ्याला संबंधित क्रमांक देण्यात येणार आहे. 

Story img Loader