पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळामधील (पीएमपीएमएल) कंत्राटदारांच्या बससोबत केवळ चालकांची सेवा घेतली जात असताना आता वाहकही कंत्राटी पद्धतीने सेवेत घेतले जाणार आहे. त्यानुसार कंत्राटी पद्धतीने (भाडेतत्त्वावर) ४०० बस सेवेत दाखल करण्यात येणार असताना एक हजार चालकांबरोबर एक हजार वाहकांचीही सेवा घेतली जाणार आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ‘जीवनवाहिनी’ असलेल्या ‘पीएमपी’ प्रशासनात अनेक वर्षांपासून अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यातच ‘पीएमपी’च्या ताफ्यात एक हजार ६०० नवीन बस दाखल करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात ६०० बस दाखल करून घेण्याचे नियोजन केले असून भाडेतत्त्वावरील ४००, तर स्वमालकीच्या २०० बसचे नियोजन आहे.

त्यापैकी भाडेतत्त्वावरील १४६ बस ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यातच ‘पीएमपी’मध्ये मनुष्यबळाची कमतरता असताना प्रशासनाकडून भाडेतत्त्वावरील कंत्राटदारांकडूनच दोन हजार मनुष्यबळ सेवेत दाखल करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये एक हजार वाहकही कंत्राटी पद्धतीने सेवेत घेतले जाणार आहे. यापूर्वी कंत्राटदारांकडून केवळ चालकच उपलब्ध करून दिले जात होते.

जुनी पद्धत काय ?

‘पीएमपी’मध्ये कंत्राटी पद्धतीने बससेवा घेण्यास सुरुवात झाल्यापासून कंत्राटदारांकडून बसबरोबर चालकही उपलब्ध करून देण्यात येत असे. वाहक ‘पीएमपी’ प्रशासनाकडून भरती प्रक्रियेद्वारे नियुक्त करून नेमले जायचे. आता वाहकांची सेवाही कंत्राटदारांकडून उपलब्ध करून देण्यात सहमती दर्शविली आहे.

‘पीएमपी’मध्ये नव्याने बस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. कंत्राटदारांच्या १४६ बस ताफ्यात दाखल झाल्या असताना मनुष्यबळाची कमतरता भासू नये म्हणून चालकांबरोबर वाहक असे दोन हजार चालक-वाहक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यांच्याकडूनच या बसच्या संचलनाचे नियोजन केले जाणार आहे. नवीन भरती प्रक्रिया तूर्तास होणार नाही. – नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल