चार राज्यांत काँग्रेसची झालेली पिछेहाट पाहता आता तरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करावे, हवेत राहता कामा नये, असे सांगत संघटन मजबूत करा, असे आवाहन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे यांनी ताथवडे येथे केले.
सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी महिला काँग्रेसच्या वतीने ताथवडे येथील ‘झेप’ संस्थेला संगणक, प्रिंटर तसेच खुच्र्या भेट देण्यात आल्या, तेव्हा त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे संयोजन महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ज्योती भारती यांनी केले होते. या प्रसंगी नगरसेवक कैलास कदम, विमल काळे, आरती चोंधे, गीता मंचरकर, हरेश तापकीर, सुखलाल भारती, माधुरी दरेकर, सुनीता यादव आदी उपस्थित होते. ‘झेप’च्या संचालिक नेत्रा तेंडुलकर यांनी सर्वाचे स्वागत केले.
व्यवहारे म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे सर्वावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने भारतीय जनतेसाठी केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्याच विचारात राहू नये, संघटन वाढवावे. दिल्लीसारखी परिस्थिती पुणे व पिंपरीत होऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत. आगामी लोकसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून सर्वानी संघटना मजबूत करावी, त्यादृष्टीने एकजुटीने प्रयत्न करावेत, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती भारती यांनी केले. राजकुमार डेंगळे यांनी सूत्रसंचालन केले. संतलाल यादव यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा