राज्यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा जीव भांडय़ात पडला असून ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. आता परीक्षेची पुढील तारीख कधी जाहीर होणार याबाबत उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाला ‘व्हायरस’ चा फटका बसल्याने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बसलेल्या सर्व उमेदवारांची माहिती नष्ट झाली होती. उमेदवारांची माहिती आणि त्याचा बॅकअप एकाच हार्डडिस्कवर ठेवण्याचा निष्काळजीपणा आयोगाला भोवला आहे. उमेदवारांना त्यांची माहिती पुन्हा भरण्याची सूचना परीक्षेला अवघे चार दिवस राहिले असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केल्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उमेदवारांना त्यांची माहिती भरण्यासाठी आयोगाकडून गुरूवार सायंकाळपर्यंत वेळ देण्यात आला होता. आपली माहिती भरण्यासाठी एकाच वेळी राज्यभरातील लाखो उमेदवार आपली माहिती भरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे संकेतस्थळ सतत क्रॅश होत होते.
या परीक्षेसाठी तीन लाख पंचवीस हजार उमेदवार बसले आहेत. त्यापैकी १ लाख ८४ हजार ३२७ उमेदवारांनी गुरूवार दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांची माहिती पुन्हा भरली होती. संकेतस्थळ क्रॅश होऊ नये म्हणून आयोगाने तीन अधिकचे सव्र्हरही वापरले होते. १ लाख ४९ हजार उमेदवारांचे प्रवेश पत्रही तयार करण्यात आले होते, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अधिकाऱ्यांनी दिली. माहिती भरण्यासाठी आणखी एक दिवस वाढवून परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याचे आयोगाच्या विचाराधीन होते. मात्र, परीक्षा देणारे उमेदवार, क्लास चालक, विद्यार्थी संघटना, राजकीय संघटना यांच्याकडून वाढत चाललेल्या दबावाच्या पाश्र्वभूमीवर राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता पुढे काय?
राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे आता पुढील परीक्षेची तयारी करण्यासाठी आयोगाला किमान एकवीस दिवसांचा वेळ लागणार आहे.  परीक्षेसाठी रविवारच आवश्यक असल्यामुळे आता ही परीक्षा नक्की कधी होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मे किंव जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ही परीक्षा होणार असल्याची चर्चा आहे. मे महिन्यामध्ये ५, १२, १९, २६ या तारखांना रविवार आहे. मात्र, त्यातील ५ तारखेचा रविवारच मोकळा आहे. बाकीच्या सर्व तारखांना आयोगाच्या परीक्षा आहेत. १२ मे ही सेल्स टॅक्स परीक्षेसाठीची अंदाजे तारीख आहे. १९ मे डेप्युटी इंजिनिअर पदासाठी ऑनलाईन टेस्ट आहे. २६ मे ला यूपीएससीची पूर्वपरीक्षा आहे. जून महिन्यामध्येही २ जूनला क्लर्क आणि टायपिस्ट पदासाठीची परीक्षा आहे. त्यानंतर ९ जूनचा रविवार मात्र मोकळा आहे.