राहुल खळदकर, लोकसत्ता 

पुणे : परदेशातून बासमती तांदळला मागणी वाढत असून बासमतीचे दर वाढत आहेत. बासमतीचा जुना साठा बाजारात शिल्लक असल्याने नवीन हंगामातील आवक होईपर्यंत बासमतीचे दर तेजीत राहणार आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

 बासमतीची लागवड उत्तरेकडील राज्यात मोठय़ा प्रमाणावर केली जाते. तेथील शेतकऱ्यांकडे सध्या तांदूळ उपलब्ध नाही. गिरणी आणि वितरकांकडे साठवणुकीतील बासमती तांदूळ आहे. परदेशातून बासमतीला मागणी वाढत आहे. बासमतीच्या १५०९ (धान) जातीला वर्षभरापूर्वी २६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. सध्या बासमती १५०९ जातीला प्रतिक्विंटल ४१०० रुपये भाव मिळाला आहे, असे मार्केट यार्डातील तांदळाचे व्यापारी राजेंद्र बाठिया यांनी सांगितले. 

 बासमतीची नवीन लागवड करण्यात आली आहे. काही बाजारपेठात बासमतीच्या १५०९ च्या नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे. बासमतीच्या सर्व प्रकारांमध्ये सध्या तेजी आहे. जुन्या धानाचा (पॅडी) हंगाम संपत आलेला असताना इराण आणि सौदी अरेबियातून बासमती तांदळाला मागणी वाढलेली आहे. त्यामुळे निर्यातदार व्यापारी देशभरातून ११२१, १४०१ आणि १५०९ या जातीचा बासमती उपलब्ध होऊ शकतो का? यादृष्टीने निर्यातदार व्यापाऱ्यांनी चाचपणी सुरू केली आहे.

१५०९ जातीच्या लागवडीस प्राधान्य 

आठवडाभरात बासमती तांदळाच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. पारंपरिक बासमती सेला तांदूळ वगळल्यास बासमतीचे सर्व प्रकार तेजीत आहेत. मागणीच्या तुलनेत बासमती तांदळाची आवक कमी होत असल्याने दरात तेजी आहे. निर्यातदार व्यापाऱ्यांकडून बासमती तांदळाला मागणी वाढत आहे. बासमतीच्या १५०९ जातीचा हंगाम संपत आला आहे. मागणी वाढती असून उत्तरेकडील राज्यांतील शेतकऱ्यांनी पारंपरिक बासमतीच्या तुलनेत १५०९ जातीच्या बासमती तांदळाच्या लागवडीस प्राधान्य दिले आहे. पारंपरिक बासमतीच्या तुलनेत १५०९ जातीच्या बासमतीच्या लागवडीस तुलनेने कमी कालावधी लागतो.

बासमतीची लागवड यंदा चांगली 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्व प्रकारच्या भाताची लागवड २६ ते २७ टक्क्यांनी कमी झाल्याचे कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. भाताची लागवड अजून सुरू आहे. हरियाणा-पंजाबमधील शेतकऱ्यांकडून लागवड सुरू आहे. यंदा मोसमी पाऊस चांगला राहणार असल्याने बासमतीच्या लागवड क्षेत्रात वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बासमती तांदळाच्या निर्यातदाराने गेल्या आठवडय़ात इराणशी बासमती तांदळाच्या निर्यातीचा करार केला. बासमती तांदूळ जहाजाने येत्या पाच ते सहा दिवसांत इराणला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतून निर्यातदार मोठय़ा प्रमाणावर बासमती तांदळाची खरेदी करतील. परदेशातून मागणी वाढत असून बासमतीच्या दरात वाढ होत आहे. जुना साठा शिल्लक आहे. बासमतीचा नवीन हंगाम सुरू होण्यास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे बासमतीच्या दरात तेजी राहणार आहे.

राजेंद्र बाठिया, बासमती तांदळाचे व्यापारी, अध्यक्ष, दी पूना मर्चंट्स चेंबर