बुधवारी सकाळी डोंगराखाली जिवंत गाडल्या गेलेल्या माळीण गावच्या दुर्दैवी रहिवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सलग तिसऱ्या दिवशीही अविरत सुरूच होते. मात्र सतत कोसळणारा पाऊस आणि मातीचा चिखल यामुळे हे मृतदेह काढणे, त्यांचे शवविच्छेदन करणे, ओळख पटवणे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे ही सारी प्रक्रिया अतिशय जिकिरीची होऊन बसली आहे. परिणामी या परिसरात असह्य़ दरुगधी दाटू लागली असून गावातील अन्य रहिवासी तसेच मदतकार्यात करणारे जवान व नागरिक यांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. बचावकार्य पूर्ण होण्यास आणखी २-३ दिवस लागण्याची शक्यता आहे.  दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रु. देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
शुक्रवार सायंकाळपर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखालून ६३ मृतदेह काढण्यात आले. त्यापैकी ५२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी दरड कोसळल्यापासून सलग तिसऱ्या दिवशीही ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण दला’चे जवान हे काम करीत आहेत.
खाली अडकलेले मृतदेह तीन दिवसांपासून मातीच्या ढिगाऱ्याखाली असल्याने दरुगधी सुटू लागली आहे. हे मृतदेह सुमारे तीन किलोमीटरवरील अडिवरे गावात नेले जातात. मात्र तेथे ते ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे काही मृतदेह बराच काळ रुग्णवाहिकेतच ठेवावे लागत आहेत.
शवविच्छेदनानंतर पुन्हा माळीण येथे आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. मधल्या काळात मृतदेहांची ओळख पटवली जात आहे. या प्रक्रियेला वेळ जात असल्याने मृतदेहांची स्थिती अधिकच खराब होत आहे. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न उभे राहू लागले आहेत.
अर्थात हे गृहित धरूनच उपाय केले जात आहेत. मृतदेह शोधण्याचे काम आणखी किमान २-३ दिवस चालण्याची शक्यता आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत
दरम्यान, बळी पडलेल्या कुटुंबाला सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या संचालक श्रीमती कुंदन याही उपस्थित होत्या.
माळीण गावात ७४ घरे होती. त्यापैकी ४४ घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. यामध्ये १६७ लोक गाडले गेल्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बचावलेल्या लोकांशी चर्चा करून त्यांचे व गावातील इतर घरांचे पुनर्वसन केले जाईल, अशी माहिती कदम यांनी दिली.
आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात
माळीणच्या दुर्घटनेवरून आरोप-प्रत्योराप आणि राजकारणही सुरू झाले आहे. आंबेगाव तालुक्यात मोठय़ा प्रमाणात पडकई योजना राबविण्यात आली आहे. त्याअंतर्गत डोंगराळ जमिनींचे शेतीसाठी सपाटीकरण केले जाते. या योजनेमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. घोडेगाव पोलीस ठाण्यात सुरेश तळेकर यांनी याबाबत तक्रार अर्ज दिला आहे. आंबेगाव तालुका कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, स्थानिक आमदार व विधानसभेचे सभापती दिलीप वळसे-पाटील यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. पडकई योजनेमुळे आदिवासी समाजातील बांधवांना मोठे फायदे झाले आहेत. मात्र, स्थानिक ग्रामस्थ पडकई योजनेलाच जबाबदार धरत आहेत.
“राज्यात डोंगराजवळ धोकादायक स्थितीत अशी किती गावे आहेत, याची पाहणी करावी लागणार असून हे काम कृषी विद्यापीठे आणि भौतिकशास्त्र विभागांकडे दिले जाईल. ही दुर्घटना का घडली याची चौकशी सुरू असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.”
– पतंगराव कदम, मदत, पुनर्वसन मंत्री

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा