पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘हेरिटेज वाॅक’प्रमाणेच उपनगरातील वारसा स्थळे, ऐतिहासिक वास्तूंसाठी स्वतंत्रपणे हेरिटेज वाॅक सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतची चाचपणी महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळांची माहिती देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हेरिटेज वाॅक सुरू करण्यात आला आहे.
या हेरिटेज वाॅकचे विस्तारीकरण करण्याचे महापालिकेच्या विचाराधीन होते. त्यानुसार महापालिका मुख्य भवनात या संदर्भात बैठक झाली. त्यामध्ये उपनगरासाठी स्वतंत्रपणे हेरिटेज वाॅक सुरू करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली. आंबेगाव येथील शिवसृष्टी, कात्रज येथील इस्काॅन मंदिर; तसेच राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, आगाखान पॅलेस, डेक्कन काॅलेज असे दोन हेरिटेज वाॅक सुरू करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
हेही वाचा >>> पुणे जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांची पदे धोक्यात? ‘हे’ आहे कारण
शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवारवाडा, लालमहाल, नाना वाडा, विश्रामबागवाडा, तुळशीबाग, शिवकालीन पेशवे मंदिर या भागासाठी हेरिटेज वाॅक सुरू करण्यात आला आहे. मात्र शहरापासून काही अंतरावर सिंहगड किल्ला, आंबेगाव येथील शिवसृष्टी, कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि इस्काॅन मंदिर, येरवडा येथील डेक्कन काॅलेज आणि नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेस अशी ठिकाणे आहेत. पीएमपीच्या पुणे दर्शन सेवेत यातील काही ठिकाणांचा समावेश आहे. मात्र त्यांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक नाहीत. तसेच ही सर्व ठिकाणे एकाच दिवसात पाहता येत नाहीत. त्यामुळे भौगोलिक स्थान आणि अंतराचा विचार करून तीन ते चार स्वतंत्र हेरिटेज वाॅक सुरू करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. वाहनव्यवस्था, गाइडची उपलब्धता या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.