‘‘शिकण्याची इच्छा होती पण घरातून परवानगी नव्हती, म्हणून मी झाडायला जाते, असे सांगून शाळेत जायची. कुठे जाते हे फक्त धाकटय़ा मुलाला सांगितले होते. एकदा शाळेत कार्यक्रमाला जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी होते, तेव्हा नवऱ्याने पाहिले. ते माझा पाठलाग करत शाळेत आले. मी शाळेत जाते समजल्यावर त्यांनी शाळा बघितली आणि मला शिकायला परवानगी दिली. आता मी तिसरीत आहे..’’
..ही कथा आहे सेवासदन संस्थेच्या प्रौढ प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या अनिता अंकुशराव यांची. रमाबाई रानडेंनी सुरू केलेल्या सेवासदन संस्थेमध्ये प्रौढ प्राथमिक शाळा हा एक छोटासा विभाग आहे. शासनाच्या नियमानुसार १४ वर्षांपेक्षा वयाने जास्त असलेल्या मुलींना प्रौढ शाळेमध्ये प्रवेश मिळतो. पहिली ते चौथी इयत्तांमध्ये केवळ २० जणी आहेत. वयोगट आहे- १४ ते ६२ वर्षे. सर्व ‘विद्यार्थिनी’ घर सांभाळून, बाहेरचे काम करून शिकायला येतात. सर्व जणी खाली जमिनीवर बसूनच अभ्यास करतात.
शाळेत अभ्यासक्रम आहे बालभारतीचा, पण विद्यार्थिनींकडून लेखन-वाचनाचा जास्त सराव करून घेतला जातो. शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिका एकच आहेत. त्यांचे नाव- संगीता येनपुरे. त्यांनी सांगितले, ‘‘नेहमीच्या शाळेतील विद्यार्थिनींना आणि या विद्यार्थिनींना शिकवण्यात खूप फरक जाणवतो. यांना ओरडावे लागत नाही. शिकायची इच्छा असल्यामुळे त्या मनापासून अभ्यास करतात. त्यांच्या वह्य़ाही सुंदर, स्वच्छ असतात. शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त सहली, स्नेहसंमेलने, दिवाळीसाठी पणत्या रंगवणे यांसारखे अनेक उपक्रम वर्षभर चालू असतात. त्यांना आनंददायी शिक्षण अनुभवता यावे यासाठी असे उपक्रम आयोजित करतो. या कामांमध्ये अध्यापिका महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती गाडगीळ यांची खूप मदत होते.’’
तिसरीतल्या पद्मा धनगर म्हणाल्या, ‘‘आईच्या आजारपणामुळे मला शिकता आले नाही, पण लग्नानंतर नवऱ्याने प्रोत्साहन दिले, शाळेत येण्याआधी त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली होती.’’ पहिलीत शिकणाऱ्या सुरेखा पुडवे यांना, शाळेत नुकतेच थोडे वाचता येऊ लागल्याचा आनंद आहे आणि अजून शिकण्याची इच्छा आहे. नुकत्याच शाळेत येऊ लागलेल्या शांता लंबूगोळ म्हणाल्या, ‘‘मंदिरात बैठकीला जाते, पण काही वाचता यायचे नाही, म्हणून शिकावेसे वाटले.’’ सुमन नायक यांना लिहिता वाचता येत नसल्याने मागे पडण्याची भीती वाटते. त्यामुळे त्या शिक्षण घेतात. ‘‘दुसऱ्याला विचारायची गरज पडू नये, पायावर उभे राहता यावे म्हणून शिकते आहे,’’ असे सत्यभामा ढाकणे आत्मविश्वासाने सांगतात.

Story img Loader