महाराष्ट्रात अनधिकृतपणे चालवले जाणारे अभ्यासक्रम आणि संस्थांवर कारवाई करण्याच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली असून आता अनधिकृत संस्था किंवा अभ्यासक्रम दाखवा, त्यावर लगेच कारवाई होईल’ असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभानंतर टोपे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी अनधिकृत संस्थांबाबत टोपे म्हणाले, ‘‘अनधिकृत महाविद्यालये, संस्था, अभ्यासक्रम विरोधी विधेयक या अधिवेशनामध्ये मांडण्यात आले आहे. ते यावेळी संमत होईल अशी आशा आहे. मात्र, याबाबत अध्यादेश काढण्यात आला असून त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली आहे. आता अनधिकृत संस्था किंवा अभ्यासक्रम दाखवा, त्यावर लगेच कारवाई होईल. या कायद्यानुसार संचालकांना महाविद्यालयांची तपासणी करून महाविद्यालय अनधिकृत आढळले तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्याचप्रमाणे अनधिकृत संस्था चालवणाऱ्या संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई होणार आहे.
त्याचप्रमाणे तंत्रज्ञान विद्यापीठ विधेयक प्रलंबित आहे. त्यावरही लवकरच निर्णय होईल. या विधेयकामध्ये तंत्रज्ञान विषयाचे पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम या विद्यापीठामार्फत, तर पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यापीठामार्फत चालवण्याचा प्रस्ताव आहे. पुण्याजवळ आयआयआयटी सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू असून त्यासाठी पुण्याजवळील तीन जागा जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवल्या असून त्या जागेवर हा प्रकल्प होणार आहे. एकूण १५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यासाठी १०० कोटी केंद्र शासनाकडून, ३५ कोटी राज्य शासनाचे आणि १५ कोटी खासगी उद्योजकांकडून गुंतवले जाणार आहेत.’’
विविध अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसंबंधी टोपे म्हणाले, ‘‘जागा रिक्त राहात असल्या, तरी गुणवत्तेशी तडजोड करण्यात येऊ नये अशा सूचना तंत्रशिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. ज्या संस्थांना विद्यार्थी मिळत नाहीत, त्या संस्थांनी प्रवेश क्षमतेची पुनर्रचना करावी.’’ येत्या दोन महिन्यांमध्ये संचालनालयातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, तर शासकीय अभियांत्रिकी आणि पदविका महाविद्यालयातील ६३० पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा