पुणे: महारेराकडे दाखल तक्रारींची ज्येष्ठताक्रमानुसारच सुनावणी होते. परंतु, आता अपवादात्मक परिस्थितीत आणि काही अटींसापेक्ष हा ज्येष्ठताक्रम वगळून प्राधान्याने सुनावणी घेण्यात येणार आहे. याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे ‘महारेरा’ने जाहीर केली आहेत.
‘महारेरा’कडे वेळोवेळी दाखल होणाऱ्या घर खरेदीदार किंवा रहिवाशांच्या तक्रारींची ज्येष्ठता क्रमानुसारच सुनावणी होते.अत्यंत अपवादात्मक आणि विशिष्ट परिस्थितीत अडचणीत असलेल्या तक्रारदारांना दिलासा देता यावा म्हणून ‘महारेरा’ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहेत. ‘महारेरा’ने ही मार्गदर्शक तत्त्वे तातडीने लागू केली आहेत. याचबरोबर एखाद्या प्रकरणी गरज वाटल्यास ज्येष्ठताक्रमाशिवाय आणि प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्याच्या अधिकार महारेराच्या अध्यक्षांना राहील, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
घर खरेदीदार ग्राहक जीवघेण्या आजाराने आजारी असेल तर ज्येष्ठताक्रम डावलून सुनावणी घेतली जाणार आहे. यासाठी अर्जदारास संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. याचबरोबर इतर सर्व तक्रारींबाबतही पूरक आणि यथोचित कागदपत्रे दाखल करावी लागणार आहेत. त्यानंतरही सुनावणीची विनंती मान्य केली जाणार आहे, असेही परिपत्रात नमूद करण्यात आले आहे.
अपवादात्मक सुनावणी कधी?
– तक्रारदाराला जीवघेणा आजार
– पुनर्विलोकन किंवा दुरुस्ती याचिका दाखल
– उच्च न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचे विशेष आदेश
– निर्णयाची अंमलबजावणी न झालेल्या प्रकरणात
– दोन्ही पक्षांमध्ये सहमती
– तक्रारदारास तक्रार मागे घ्यावयाची असल्यास
– तक्रार टिकण्यासारखी नसल्यास
– एखाद्या प्रकल्पाविरुद्धच्या अनेक तक्रारी