पुणे : आक्षेपार्ह शब्द असलेल्या रॅप गाण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विनापरवानगी चित्रीकरण करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या प्रकरणी विद्यापीठाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात उडी घेत ‘विद्रोह दाबता येणार नाही’ अशी भूमिका मांडली.
सल्तनत या युट्यूबवर प्रदर्शित केलेल्या गाण्यातील शब्दांवर आक्षेप घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस आकाश झांबरे पाटील यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी विद्यापीठाने गाण्याच्या चित्रीकरणाला परवानगी दिली नसल्याचे नमूद करून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याबाबत स्पष्ट केले. त्यानंतर विद्यापीठाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी हे गाणे केलेल्या शुभम जाधवला पाठिंबा दिला. ‘ एकतर बेकायदेशीररित्या पोलीस स्टेशनला बसवायचे, काहीही चुकी नसताना गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीनी फोन केला तर ‘जा फोन घेत नाही जा’ असं उद्धटपणाने उत्तर द्यायचे ह्याला काय म्हणायचे? शुभम हा बौद्ध समाजातील मुलगा असून आंबेडकरी चळवळीत काम करतो. तुम्हांला विद्रोह दाबता येणार नाही,’ असे ट्विटर डॉ. आव्हाड यांनी केले.