सोबत विविध अवजारे व सुरक्षेची साधने घेऊन वीज यंत्रणेच्या दुरुस्ती व देखभालीचे काम करताना आजवर केवळ पुरुष कर्मचारीच दिसत होते. मात्र, ‘महावितरण’ च्या नव्या भरतीमध्ये ‘लाइन मन’ सह आता ‘लाइन वूमन’ चीही नेमणूक करण्यात आल्याने त्यानिमित्ताने आणखी एका नव्या क्षेत्रात महिलांचा प्रवेश झाला आहे. पुणे विभागामध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारच्या २४ महिला विद्युत सहायक नुकत्याच रुजू झाल्या आहेत.
‘महावितरण’ च्या वतीने नुकतीच तब्बल सात हजार विद्युत सहायकांची भरती करण्यात आली. त्यात २२०० महिला सहायक विद्युत सहायकांचा समावेश आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर महिला विद्युत सहायकांची ही पहिलीच भरती आहे. आयटीआय व दहावी उत्तीर्ण असलेल्यांमधून ही भरती करण्यात आली आहे. पुणे परिमंडलामध्ये २४८ विद्युत सहायकांमध्ये २४ महिलांचा समावेश आहे. या महिला विद्युत सहायक मुळशी, पिंपरी, कोथरूड, राजगुरुनगर, शिवाजीनगर, भोसरी, मंचर या विभागात नुकत्याच रुजू झाल्या. या महिला विद्युत सहायकांना वीज वितरण यंत्रणेतील देखभाल व दुरुस्तीच्या विविध कामांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
महिला विद्युत सहायकांची मोठय़ा प्रमाणावर नियुक्ती झाली असल्याने त्यांना व्यवस्थित काम करता यावे, प्रोत्साहन मिळावे. त्याचप्रमाणे त्यांच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने राज्य पातळीवर तेजस्विनी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये पुणे परिमंडलासह सर्व १४ परिमंडलातील एक वरिष्ठ महिला अभियंत्याची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यालयातील अधीक्षक अभियंता पुष्पा चव्हाण समितीच्या अध्यक्षस्थानी कार्यरत आहेत. ‘महावितरण’ च्या मुंबई येथील मुख्यालयात महिला विद्युत सहायकांची एक कार्यशाळाही घेण्यात आली. त्यात जलसंपदा विभागाच्या सचिव मालिनी शंकर यांनी मार्गदर्शन केले. ‘महावितरण’ चे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता, ‘महानिर्मिती’ चे व्यवस्थापकीय संचालक आशिष शर्मा त्या वेळी उपस्थित होते.

Story img Loader