मागील काही महिन्यापासून मीटू मोहिमेवरुन सिनेसृष्टी आणि राजकीय क्षेत्रात एक वादळ निर्माण झाले होते. यामुळे अनेक अभिनेत्यांना, राजकीय नेत्यांना त्याचा फटका बसला. अशा या वादळी ठरलेल्या मोहिमेचा आधार घेत पुण्यातील एक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फलक पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नद्यांबाबत आहे. नद्यांची सद्यस्थिती पाहता यातील मजकुरातून आपल्यावरही अत्याचार होत असल्याची भावना जणू या नद्यांनी व्यक्त केली आहे.

पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर हा फलक लावण्यात आला आहे. यामध्ये हो, मी पीडित आहे. #Metoo… असा मजकूर आहे. त्यामुळे हा फलक येणार्‍या-जाणार्‍या व्यक्तीचे लक्ष वेधून घेत आहे.

या फलकावर लिहीलयं काय?

#Metoo…
गेली कित्येक दशकं माझ्या संमतीशिवाय होत अलंय, कधी माझ्या गर्भातून वाळू उपसा तर कधी घराघरातील सांडपाणी, कधी निर्माल्याच्या रूपात कचरा तर कधी असभ्य, असंस्कृतांची मनमानी.

हो, मी पीडित आहे. #Metoo…
नदी प्रदुषित अथवा कोणतेही सार्वजनिक जलप्रवाह प्रदुषण करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम (२७७) च्या अंतर्गत तीन महिने कारावास, दंड किंवा दोन्ही या कलमास पात्र राहील.

अतिशय कल्पक पद्धतीने या मजकुरातून मुळा-मुठेचं भयाण वास्तव यातून मांडण्यात आलं आहे. त्यामुळे आता याचं गांभीर्य ओळखून महापालिका प्रशासन किंवा नागरीक नदीच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.

Story img Loader