समाविष्ट गावांमधील टेकडय़ांवर जैववैविध्य उद्यानाचे (बायोडायव्हर्सिटी पार्क- बीडीपी) आरक्षण ठेवण्यासाठी जो निधी लागणार आहे, तो आम्ही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देणाऱ्या स्वयंसेवी संस्था आता कोठे आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.
समाविष्ट गावांमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक बीडीपीच्या विरोधात सक्रिय झाले असून पक्षाध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे त्यांनी हा मुद्दा नेला आहे. बीडीपीग्रस्त नगरसेवक बीडीपीच्या विरोधात सक्रिय झाल्यामुळे शहरातील स्वयंसेवी संस्थांनीही या नगरसेवकांच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, तसेच अजित पवार, सुप्रिया सुळे यांची बीडीपी विरोधकांकडून दिशाभूल होत असल्याची टीका स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.
स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या या टीकेमुळे राष्ट्रवादीमध्ये त्या विरोधात प्रतिक्रिया उमटली असून संस्थांची भूमिका चुकीची असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. बीडीपी आरक्षण असलेली जमीन ताब्यात घेण्यासाठी हजारो कोटी रुपये लागणार आहेत आणि ती रक्कम आम्ही देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थांकडून उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देणाऱ्या स्वयंसेवी संस्था आता कोठे आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादीचे सभागृहनेता सुभाष जगताप यांनी उपस्थित केला आहे. आम्ही काही मत मांडले, तर ती दिशाभूल आणि इतरांनी मांडले की ते योग्य मत, असा चिमटाही त्यांनी संस्थांना काढला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा