आषाढी एकादशीला पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे म्हणजे तासन्तास रांगेत उभे राहणे आलेच.. पण या वेळी अशी रांग न लावताही दर्शन घेणे शक्य होणार आहे, कारण आता दर्शनासाठी ऑनलाईन आरक्षण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे येत्या शुक्रवारी असलेल्या आषाढी एकादशीसाठी तब्बल १८ हजार जणांनी नोंदसुद्धा केली आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी ही माहिती दिली. आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी कित्येक तास रांगा लावाव्या लागतात. काही भाविक तर २४-२६ तास रांगेत उभे राहतात. त्यांचा त्रास कमी व्हावा या हेतूने ‘ऑनलाईन आरक्षणा’ ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात असेल. तिथे भाविकांची छायाचित्रे काढून नोंद करून घेण्यात येते. भाविकांनी अशा प्रकारे आरक्षण करावे, यासाठी विविध दिंडय़ांच्या प्रमुखांना त्याबाबत माहिती देण्यात येत आहे. असे आरक्षण केल्यावर भाविकांना दर्शनाची वेळ दिली जाईल. त्यामुळे रांगेत उभे न राहता काही वेळातच त्यांना दर्शन घेता येईल. वेळ पुढे-मागे झाली तरी तास-दोन तासात दर्शन घेता येईल, २४-२६ तास रांगेत ताटकळत उभे राहण्याची आवश्यकता नाही. त्याला प्रतिसाद या आषाढीसाठी म्हणून आतापर्यंत सुमारे १८ हजार जणांनी तशी नोंद केली आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
आषाढीला ९ लाख भाविकांची शक्यता
आषाढी एकादशीला पंढरपुरात या वेळी गेल्या वर्षीच्या तुलनेत सव्वापट म्हणजेच तब्बल ९ लाख भाविक येण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. त्यांच्या व्यवस्थेसाठी अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. तिथे अडीच हजारांहून अधिक शौचालये बांधण्यात आली आहेत. याचबरोबर भाविकांच्या पाण्यासाठी जादा टँकर, स्वच्छतेसाठी ३०० हून अधिक सफाई कामगार, भाविकांच्या राहण्यासाठी विविध ‘डॉरमेटरीज्’ उभारण्यात आल्या आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.
‘पालखी तळ, विसाव्याच्या जागा ताब्यात घेणार’
आळंदी व देहूहून पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांच्या मुक्कामाची ठिकाणे व त्यांच्या विसाव्याच्या जागा ताब्यात घेण्याची योजना असून, त्यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. मात्र, यावर निश्चित कधी कार्यवाही होणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

Story img Loader