महापालिकेत होणारी द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील सरळ सेवा भरतीचे काम यापुढे खासगीकरणातून करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी एकमताने घेण्यात आला. उमेदवारांची परीक्षा घेण्याचे व त्यातून पात्र उमेदवार मुलाखतीसाठी निवडण्याचे काम एमकेसीएलला देण्यास समितीने मंजुरी दिली. उमेदवारांची निवड करण्याचे काम अशा पद्धतीने प्रथमच खासगी संस्थेला देण्यात येत आहे.
स्थायी समितीमध्ये घेण्यात आलेल्या या निर्णयाची माहिती समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरळ सेवा भरतीमधील वर्ग दोन, तीन व चारमधील पदांच्या भरतीची संपूर्ण प्रक्रिया एमकेसीएलमार्फत करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. ही भरती ऑनलाईन केली जाणार असून त्यासाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी आमंत्रित करणे, पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा आयोजित करणे, उत्तर पत्रिका तपासून परीक्षेचा निकाल जाहीर करणे ही सर्व प्रक्रिया एमकेसीएल मार्फत केली जाणार आहे.
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतल्या जातील व उमेदवारांची अंतिम निवडही महापालिकेचे अधिकारी करतील. कर्मचारी भरतीची संपूर्ण प्रक्रिया आतापर्यंत महापालिकेकडूनच पार पाडली जात होती.

Story img Loader