संजय जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : पुणे-लोणावळा लोकल सेवा दुपारच्या वेळेत तीन तास बंद असते. लोहमार्गांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी ही सेवा बंद ठेवली जाते. त्यामुळे दुपारच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते. आता प्रवाशांच्या सोईसाठी दुपारच्या वेळी लोकलची एक फेरी सुरू करण्याचे नियोजन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने केले आहे.

पुणे-लोणावळा दरम्यान लोकलच्या दिवसभरात ४० फेऱ्या होतात. या लोकलने दररोज ६० हजार प्रवासी प्रवास करतात. पुणे-लोणावळा लोकल सेवा सकाळी ११ वाजून १५ मिनिटे ते दुपारी तीन या काळात बंद असते, तर लोणावळा-पुणे लोकल सेवा सकाळी १० ते दुपारी २ वाजून ५० मिनिटे या कालावधीत बंद असते. यामुळे दुपारी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाविद्यालये दुपारी सुटणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलसाठी काही तास स्थानकावर प्रतीक्षा करीत थांबावे लागते अथवा इतर पर्यायांचा प्रवासासाठी वापर करावा लागतो.

आणखी वाचा-‘जेसीबी’ची वाटचाल आता हायड्रोजन इंधनाकडे!

नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे-लोणावळा लोकल सेवा दुपारी सुरू ठेवण्याची सूचना केली होती. त्यानंतर रेल्वेने यावर विचार सुरू केला आहे. आता रेल्वेकडून पुणे-लोणावळा आणि लोणावळा-पुणे अशी प्रत्येकी एक लोकल दुपारी सोडण्याचे नियोजन केले जात आहे. लवकरच ही सेवा सुरू होईल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

पुणे-लोणावळा लोकल सेवा देखभाल व दुरुस्तीसाठी दुपारी तीन तास बंद ठेवण्यात येते. या कालावधीत लोहमार्गाची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तपासणी यासह इतर सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची कामे केली जातात. या कालावधीत दोन्ही बाजूकडून प्रत्येकी एक लोकल सोडण्याचा विचार सुरू आहे. -डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now pune lonavala local will run in the afternoon as well pune print news stj 05 mrj