पुणे : रेल्वेच्या जुन्या डब्यांचा वापर करून त्यातच उपाहारगृह सुरू करण्याची अभिनव योजना राबविण्यात येत आहे. पुणे विभागात सुरुवातीला चिंचवड स्थानकावर हा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर आता पुणे स्थानकावर ताडीवाला रस्त्याच्या बाजूच्या वाहनतळात रेल्वेच्या डब्यात हॉटेल उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. हे उपाहारगृह येत्या महिन्याभरात सुरू होणार आहे. याचबरोबर आगामी काळात आकुर्डी, बारामती आणि मिरज स्थानकांवरही अशा स्वरूपाचे उपाहारगृह सुरू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे प्रशासनाने २०२० पासून ‘रेस्टॉरन्ट ऑन व्हिल्स’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. यात रेल्वेच्या जुन्या डब्यांचे उपाहारगृहांमध्ये रुपांतर करण्यात आले. देशभरात अनेक स्थानकांच्या आवारात ही उपाहारगृहे सुरू करण्यात आली. देशात पहिले अशा स्वरूपाचे उपाहारगृह पश्चिम बंगालमधील असनसोल स्थानकावर उभे राहिले. त्यानंतर मध्य रेल्वेच्या पुणे विभागात मागील वर्षी डिसेंबर महिन्यात चिंचवड स्थानकावर हा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर पुणे स्थानकावर हे उपाहारगृह आता सुरू होत आहे.

आणखी वाचा-पदवी, तात्पुरत्या प्रमाणपत्रावर आधार क्रमांक नमूद करण्यास प्रतिबंध

रेल्वेच्या डब्याची लांबी सुमारे २४ मीटर आणि रुंदी सव्वातीन मीटर असते. रेल्वेचे जुने डबे तसेच पडून असतात. ते वापरात आणून त्यांचा प्रवाशांना सेवा देण्यासाठी वापर करण्याच्या हेतूने रेल्वेने हे पाऊल उचलले. या डब्यांचे रुपांतर उपाहारगृहामध्ये करण्यात येते. या उपाहारगृहाची आसनक्षमता ४० आहे. पुणे रेल्वे स्थानकात या उपाहारगृहाच्या उभारणीचे काम पूर्ण होत आले आहे. महिनाभरात हे उपाहारगृह सुरू होणार असून, ते २४ तास खुले असणार आहे.

प्रवाशांना चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी रेल्वेच्या डब्यातच उपाहारगृह सुरू होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी २४ तास खुले असणाऱ्या या उपाहारगृहामध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेता येईल, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी सांगितले.

आणखी वाचा-पुणे: डेक्कन जिमखाना भागात व्हेल माशाची उलटी जप्त, आंतराष्ट्रीय बाजारात पाच कोटी किंमत

रेल्वेला मिळणार लाखोंचे उत्पन्न

रेल्वेकडून रेस्टॉरन्ट ऑन व्हिल्स चालविण्यास देण्यासाठी निविदा काढली जाते. पुणे स्थानकावरील या उपाहारगृहाचे कंत्राट हल्दीराम या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीला पाच वर्षांसाठी हे कंत्राट मिळाले आहे. त्यातून रेल्वेला वर्षाला ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now restaurant on wheels in pune restaurant in a train compartment pune print news stj 05 mrj
Show comments