शहरात पडलेल्या खड्डय़ांना महापालिकेचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप ठेकेदार एस. पी. ठाकर यांनी केला आहे. रस्त्याच्या कामांसाठी ज्या निविदा काढल्या जातात, त्यात वेगवेगळ्या घटकांचे दर छापलेले असतात, त्याप्रमाणे ठेकेदारांकडून घेतली जाणारी टक्केवारीही निविदेत छापावी म्हणजे सगळ्याच बाबी उघड होतील, असेही ठाकर यांचे म्हणणे आहे.
कात्रजमधील दत्तनगर जांभुळवाडी येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम ठाकर कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले होते. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड या कंपनीने खड्डेतपासणीचा जो अहवाल महापालिकेला दिला आहे, त्यात या रस्त्यावर खड्डे पडल्याचे म्हटले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बाजू मांडताना ठाकर म्हणाले, की हे काम एक कोटी ३५ लाखांचे असून त्यापैकी दहा टक्केच काम आम्ही आतापर्यंत केले आहे. या रस्त्यावर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी तसेच इतर कामांसाठी खोदाई केली होती. तसेच या रस्त्यावर रोज तीनशे ट्रक व अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळेच हा रस्ता एका ठिकाणी खचला असून त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही.
ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे ती बाब आम्ही काम सुरू करण्यापूर्वीच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसे पत्रही दिले होते. या ठिकाणी घाईगर्दीने चांगले काम होणार नाही, हेही कळवले होते. तरीही पावसाळ्यापूर्वी काम करा असा दबाव अधिकाऱ्यांनी आणला आणि काम करून घेतले. त्यानंतर पावसामुळे जेथे रस्ता खराब होईल हे आम्ही सांगितले होते, नेमका तेवढाच रस्ता खराब झाला आहे. आमचे उर्वरित सर्व काम मोठय़ा पावसानंतरही सुस्थितीत आहे, असेही ठाकर यांनी सांगितले. या प्रकारामुळे आमची जी बदनामी झाली. म्हणून आम्ही महापालिकेविरुद्ध दावा दाखल करणार आहोत, असेही ते म्हणाले.
‘सक्षम अधिकारीच नाहीत’
खड्डे पडले की ठेकेदारांनी एवढे पैसे घेतले, तेवढे पैसे घेतले अशी नावे जाहीर होतात. तशी मग नगरसेवकांची नावे का जाहीर होत नाहीत, असा प्रश्न विचारून ठाकर म्हणाले, की अनेक जण कामांमध्ये जी टक्केवारी घेतात त्याचीही यादी निविदेमध्येच छापली, तर निदान खरी बाजू तरी लोकांसमोर येईल. महापालिकेकडे अभियांत्रिकी तसेच तांत्रिक स्वरूपाची माहिती असलेले सक्षम अधिकारी नाहीत. जे आहेत ते सगळे ऑफिसमध्ये बसून फक्त निविदा काढतात. त्यांना जागेवरील वस्तुस्थितीची कोणतीही कल्पना नसते. त्यामुळे तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय शहरातील रस्ते कधीच सुधारणार नाहीत.

Story img Loader