महापौरपदासाठीची निवडणूक आता संपली आहे. आपण सर्व जण नगराचे सेवक म्हणून महापालिकेत निवडून आलो आहोत. आता मतभेद विसरून सर्व जण शहरासाठी नगरसेवक म्हणून काम करू या, असे आवाहन नव्या महापौर चंचला कोद्रे यांनी खास सभेत गुरुवारी केले.
महापौर निवडणुकीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर खास सभेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले. नगरसेवकांनी तसेच पक्षनेत्यांनी कोद्रे यांना महापौरपदासाठी शुभेच्छा दिल्या आणि या पदावर काम करताना पुणे शहराच्या हिताचे निर्णय घ्या, असे आवाहनही केले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी मावळत्या महापौर वैशाली बनकर यांच्या कार्यकाळातील कामकाजाचेही यावेळी आवर्जून कौतुक केले. तसेच त्यांनी सतरा महिने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्याची पावतीही दिली.आपण सर्व जण नगराचे सेवक म्हणून निवडून आलो आहोत. निवडणुकीनंतर आता आपसातील मतभेद विसरून आपण नगरसेवक म्हणून काम करू या, असे आवाहन महापौर कोद्रे यांनी या वेळी केले. कोद्रे घराण्याची राजकारण, समाजकारणाची साठ वर्षांची तपश्चर्या आहे. त्याचे फळ मला मिळाले, असेही त्या म्हणाल्या.
कोद्रे घराण्याचा बहुमान
महापौर चंचला कोद्रे प्रभाग क्रमांक २० अ (मुंढवा) मधून निवडून आल्या असून राजकारणातील पदार्पणातच त्या २०१२ मध्ये नगरसेविका झाल्या. त्या पाठोपाठ त्यांना पक्षाने महापौरपदाचीही संधी दिली आहे. इंग्रजी माध्यमात शिक्षण झालेल्या कोद्रे द्विपदवीधर आहेत. त्यांचे सासरे कैलास कोद्रे हेही तीन वेळा महापालिकेत निवडून आले होते. या काळात दोन वेळा त्यांचे महापौरपदासाठी नाव आले होते. मात्र, त्यांची संधी हुकली. ही संधी त्यांना मिळाली नाही; पण त्यांच्या सूनबाईंना मात्र संधी मिळाल्यामुळे कोद्रे घराण्याचाच हा बहुमान मानला जात आहे.
मावळत्या महापौरांना भावना अनावर
खास सभेत नव्या महापौर चंचला कोद्रे यांच्या भाषणापूर्वी मावळत्या महापौर वैशाली बनकर यांचे भाषण झाले. त्या आधी नगरसेवकांनी बनकर यांचे मन:पूर्वक कौतुक केले. त्यांनी कार्यकाळात कोणालाही दुखावले नाही. सर्वाना समान वागणूक दिली. तसेच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहताना त्यांच्याकडून कधीही वेळ चुकली नाही. उशीर करून त्यांनी आयोजकांना कधीही वाट बघायला लावली नाही, अशा शब्दात बनकर यांचे कौतुक झाले. ‘महापौरपदावर काम करण्याची संधी मिळाली, हे मोठे भाग्य मानते असे यावेळी बनकर यांनी सांगितले. सर्वाचे आभार मानताना त्यांना भावना अनावर आणि हुंदकेही अनावर झाले. त्या क्षणी सारे सभागृह देखील स्तब्ध झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा