कोणतेही वेगळे सॉफ्टवेअर न वापरता किंवा इंटरनेटशी जोडलेले न राहताही आपल्या विंडोज संगणकावर मराठीतून मजकूर लिहिणे आता शक्य होणार आहे.
स्थानिक भाषांमधून संगणनाला उत्तेजन देण्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट इंडिया’ने ‘भाषा’ हा उपक्रम हाती घेतला असून या अंतर्गत १४ भारतीय भाषांमधून संगणन करण्यासाठीच्या साधनांचा संच कंपनीने मोफत उपलब्ध करून दिला आहे.
नॅशनल ई- गव्हर्नन्स अॅकॅडमीच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर आयटी इन इंडियन लॅग्वेजेस’ या केंद्राच्या कार्यकारिणीत मायक्रोसॉफ्टला स्थान मिळाले आहे. या पाश्र्वभूमीवर कंपनीचे प्रमुख उत्पादन विपणन व्यवस्थापक मेघश्याम करणम यांनी मंगळवारी पत्रकारांना भाषा या उपक्रमाविषयी माहिती दिली.
विंडोज एक्सपी, विंडोज व्हिस्टा, विंडोज ७, ८ आणि ८.१ या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर १४ भारतीय भाषांमधून काम करता येणार आहे. यात मराठी, हिंदी, कोकणी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम, उर्दू, बंगाली, आसामी, उडिया, पंजाबी, नेपाळी या भाषांचा समावेश आहे. करणम म्हणाले, ‘‘ग्राहकांना ‘यूझर इंटरफेस’ आणि ‘हेल्प’ ही साधने स्थानिक भाषांमधून वापरता येतीलच, तसेच स्थानिक भाषेत मजकूरही टाईप करता येईल. या साधनांमध्ये ९ भाषांसाठी ‘डेटा कन्व्हर्टर’ या साधनाचाही समावेश आहे. या कन्व्हर्टरच्या साहाय्याने ग्राहकांना आपल्या ‘नॉन युनिकोड लेगसी डेटा’चे रुपांतर ‘युनिकोड डेटा’मध्ये करता येईल. तसेच हिंदी- इंग्रजी आणि हिंदी- इंग्रजी- गुजराती असे दोन प्रकारचे शब्दकोशही ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.’’
http://www.bhashaindia.com या संकेतस्थळावर ही संगणन साधने मोफत डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध आहेत. ही साधने वापरून संगणन करण्यासाठी आवश्यक असणारे ‘मायक्रोसॉफ्ट ऑफिस’ मात्र ग्राहकांनी विकत घ्यायचे आहे.