पिंपरी : शहरातील नागरिकांना आपल्या घराजवळच आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत शहरातील ४० ठिकाणी ‘नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र’ आणि ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. या आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत पाच केंद्रे आणि आपला दवाखाना असेल, असे नियोजन महापालिकेने केले आहे. यासाठी भाडेतत्त्वावर जागा घेतली जाणार आहे. नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानासाठी जागा देणाऱ्या मालकांसोबत अकरा महिन्यांचा भाडेकरार केला जाणार असून, आवश्यकतेनुसार मुदतवाढ दिली जाणार आहे. भाडे तत्त्वावर द्यावयाच्या मालमत्ता किंवा मिळकतींचे सर्व कर, पाणीपट्टी, विद्युत देयके करारनामा करण्याच्या तारखेपर्यंत भरलेली असणे आवश्यक आहे.
भाडेकरार केल्याच्या तारखेपासून करार संपुष्टात येण्याच्या तारखेपर्यंत येणारी सर्व विद्युत आणि पाणीपट्टी देयके महापालिकेचा वैद्यकीय विभाग भरणार आहे. मात्र, मिळकतकर, देखभाल-दुरुस्ती खर्च आणि भाडेकरार करण्यासाठीचा खर्च जागामालकाने करायचा आहे. बाजारभावाप्रमाणे अथवा महापालिकेने निश्चित केलेल्या दराने दरमहा भाडे दिले जाणार आहे. इमारतीबाबत भविष्यात वादविवाद किंवा काही अडचण निर्माण झाल्यास भाडेकरार आपोआप संपुष्टात येणार आहे. कायदेशीर बाबी उद्भवल्यास जागामालक जबाबदार राहतील.
दवाखान्यासाठी जागा उपलब्ध करून देताना जागामालकाने स्वच्छतागृहाची सोय करून देणे आवश्यक आहे. जागेच्या बांधकामाचे आकारमान किमान ७५० ते कमाल एक हजार चौरस फूट आणि किमान तीन-चार खोल्या असाव्यात, अशा अटी-शर्ती असून, त्या मान्य असलेल्या जागामालक, संस्थांनी २० डिसेंबरपर्यंत क्षेत्रीय कार्यालयांत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले.
राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातील विविध भागांत ४० नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्यात येणार आहे. दवाखान्यासाठी जागा देणाऱ्या मालकांसोबत ११ महिन्यांचा भाडेकरार केला जाणार असून आवश्यकतेनुसार मुदतवाढ दिली जाणार आहे. – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका