चहा- कॉफी आणि वडापाव हेच रोजचे अन्न असणाऱ्या नागरिकांना या पदार्थाच्या आरोग्यपूर्णतेची खात्री मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या एका वर्षांत या पदार्थाच्या विक्रेत्यांनी मोठय़ा प्रमाणावर अन्न व औषध विभागाचे परवाने घेतले असून मटण, चिकन आणि अंडी विक्रेत्यांमध्येही परवाने घेण्याबाबत जागरुकता दिसत आहे. अन्न विभागाचे सहायक आयुक्त शिवाजी देसाई यांनी ही माहिती दिली आहे.
बारा लाखांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असणाऱ्या अन्न विक्रेत्यांना परवाना घ्यावा लागतो तर त्यापेक्षा कमी उलाढाल असणाऱ्यांना विभागाकडे नोंदणी करावी लागते. एप्रिल २०१२ पासून आतापर्यंत पुण्यातील ३७ चहा- कॉफी विक्रेत्यांनी विभागाचा परवाना घेतला असून ४६३ विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे. वडापाव विक्रेत्यांपैकी तेरा जणांनी परवाने घेतले आहेत, तर ६३६ वडापाव विक्रेत्यांनी विभागाकडे नोंदणी केली आहे.
पूर्वी ‘अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्या’द्वारे अन्न विक्रेत्यांना महापालिकेकडून परवाने घ्यावे लागत. ५ ऑगस्ट २०११ नंतर ‘अन्न सुरक्षा कायद्या’नुसार हे परवाने एफडीएकडून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. पूर्वीच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याबरोबरच कारवाईच्या भीतीमुळे नवीन परवाने घेणाऱ्या विक्रेत्यांचे प्रमाण वाढले आहे. मटण, चिकन व अंडी विक्रेते, उपाहारगृहे, वाईन दुकाने आदींमध्ये याबाबत जागरुकता दिसून येत असल्याचे निरीक्षण देसाई यांनी नोंदविले. विशेषत: अन्नपदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवाने असल्याशिवाय कंपन्या मालच देत नसल्याने हे परवाने काढण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात ४०७ अन्न वाहतूक परवाने काढण्यात आले आहेत. भाजी व फळे विक्रेत्यांनीही आवश्यक परवाने काढावेत यासाठी विभागातर्फे जागृती मोहीम घेणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा