आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षापदी निवड झाल्याच्या निमित्ताने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते रूपाली चाकणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या भाषणात ड्रग्ज प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना म्हटलं की, ”आता जे काही चाललं आहे, त्यावर मी काही बोलत नाही. मात्र सध्या शहरांमध्ये तालुका पातळीपर्यंत आज खूप मोठ्याप्रमाणावर ड्रग्जचं प्रमाण वाढलं आहे, ही वस्तूस्थिती आपल्याला मान्य केली पाहिजे आणि ती मोडून काढण्यासाठी आपल्याला पूर्ण प्रयत्न केले पाहिजे. या दृष्टिकोनातून गृह विभागाच्या माध्यमातून आम्ही सूचना दिलेल्या आहेत. या गोष्टीचे समुळ उच्चाटन करण्याची गरज असून त्यादृष्टीने राज्य सरकार योग्य ती पावले उचलत आहे.”

तसेच, महिलांच्या दीक्षा कायद्याबाबत मागील दोन वर्षापासून चर्चा असून त्यावर भाष्य करताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, दीक्षा कायद्याबाबत अनेक व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात आले असून येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्याचा प्रारुप आराखडा मंजूर केला जाईल. तसेच महिला किंवा लहान मुलींवर अन्याय अत्याचाराच्या घटना ह्या त्यांच्याच ओळखीच्या व्यक्तीकडून होत आहेत. अशी माहिती समोर आली असून त्याचे प्रमाण ९५ टक्के इतके आहे. त्या दृष्टीने येत्या काळात प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधून, त्यांच्या भावना जाणून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

याचबरोबर, ते पुढे म्हणाले की, महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्या दृष्टीने राज्य सरकार अनेक पावलं उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केवळ महिलावरील सर्व प्रकाराच्या तक्रारी मार्गी लावण्यासाठी, राज्यातील प्रत्येक शहरात एक पोलीस स्टेशन असेल, तिथे महिला आपल्या तक्रारी मांडू शकतील आणि तेथील पूर्ण काम महिला पोलिस अधिकारीच पाहतील, याबाबतची घोषणा लवकरच राज्य सरकार करेल, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader