नॅशनल एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (एनईएफ) आयोजित केल्या जाणाऱ्या एन्डय़ुरो साहसी क्रीडा स्पर्धेस यंदा बारा वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय स्तरावर यशस्वीरीत्या या स्पर्धेचे संयोजन केल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर संयोजन करण्याचे वेध आम्हाला लागले आहेत, असे फाऊंडेशनचे संचालक प्रसाद पुरंदरे यांनी सांगितले.
एनईएफतर्फे दरवर्षी सहय़ाद्रीच्या डोंगरपरिसरात सव्वाशे किलोमीटर सायकलिंग व तेवढय़ाच अंतराचे पदभ्रमण अशी नावीन्यपूर्ण साहसी क्रीडा स्पर्धा आयोजित केली जात आहे. सांघिक स्वरूपाच्या या स्पर्धेस दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्याविषयी पुरंदरे म्हणाले, केवळ हौशी खेळाडू नव्हेतर त्यांच्याबरोबरीने डॉक्टर्स, पोलीसदल, प्रसारमाध्यमे, नोकरदार, कुटुंब, शिक्षक व विद्यार्थी अशा विविध गटांत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आपल्या देशात नोकरी किंवा व्यवसायानिमित्ताने आलेले काही परदेशी खेळाडूही या स्पर्धेत भाग घेत आहेत. त्यांच्याइतकीच अव्वल दर्जाची कामगिरी आपले स्थानिक खेळाडू करून दाखवत आहेत हेच आमच्या स्पर्धेमागचे ध्येय साध्य झाले आहे.
सायकलिंग व पदभ्रमणाबाबत लोकांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही जनजागृती करण्यात यशस्वी झालो आहोत. मोटारसायकली व स्कूटर्सच्या वाढत्या उपयोगामुळे मध्यंतरी सायकलींचा उपयोग कमी होत चालला होता. केवळ पुण्यात नव्हेतर महाराष्ट्रात आम्ही सायकलिंग संस्कृती पुन्हा लोकप्रिय करण्यात यशस्वी झालो आहोत. स्पर्धेत भाग घेणारे अनेक खेळाडू तीन-चार महिने अगोदरपासून तयारी करीत असतात. दरवर्षी स्पर्धेचा मार्ग अधिकाधिक आव्हानात्मक केला जात असला तरी स्पर्धक अतिशय उत्साहाने हे आव्हान पेलवतात व स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद घेतात असेही पुरंदरे यांनी सांगितले.
स्पर्धेच्या मार्गाविषयी विचारले असता पुरंदरे यांनी सांगितले, दरवर्षी आम्ही पानशेत, खडकवासला, सिंहगड परिसरातील डोंगराळ भागात ही स्पर्धा घेत असतो. प्रत्येक वर्षी मार्गात थोडासा बदल आम्ही करीत असतो. त्यासाठी स्पर्धेपूर्वी तीन महिने अगोदरच आम्ही मार्गाची रेकी करतो. स्पर्धेपूर्वी तीन दिवस अगोदरही पुन्हा रेकी केली जाते. भाग घेणाऱ्यांपेक्षा स्वयंसेवकांची संख्या तीनपट असते. ज्या ज्या ठिकाणी स्पर्धक मार्गाबाबत संभ्रमात पडण्याची शक्यता असते, त्या त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक असतात. बहुंताश स्वयंसेवक हे हौशी व युवक स्वयंसेवक असतात. आजपर्यंतच्या स्पर्धेच्या निकालाविषयी कोणत्याही खेळाडूने आक्षेप नोंदविलेला नाही किंवा तक्रारही केलेली नाही हीच आमच्या संयोजनाची मोठी पावती आहे.

Story img Loader