पुणे : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) १५ जानेवारीला घेण्यात येणारी विद्यापीठ अनुदान आयोग – राष्ट्रीय पात्रता परीक्षा (युजीसी नेट) लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता या परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. एनटीएचे संचालक राजेश कुमार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यूजीसी नेट परीक्षा डिसेंबर आणि जून अशी वर्षातून दोनवेळा घेण्यात येते.
हेही वाचा >>> उजनी धरणाच्या जलाशयात वाळू माफियांचा धुडगूस
यूजीसी नेट या परीक्षेद्वारे सहायक प्राध्यापक पदासाठीची आणि कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्तीची पात्रता, तसेच पीएच.डी.साठी पात्रता ठरवली जाते. या परीक्षेसाठी ८५ विषय उपलब्ध असतात. डिसेंबर सत्राची परीक्षा ३ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत घेण्यात येत आहे. मात्र, मकर संक्रांत, पोंगल आणि सण असल्याने १५ डिसेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर केवळ १५ जानेवारी होणारी परीक्षा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता पुढे ढकलण्यात आलेल्या १५ जानेवारीच्या परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. तर १६ जानेवारीची परीक्षा आधीच्याच नियोजनानुसार होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.