पुणे : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेबाबत (नीट यूजी) संशयास्पद दावे करणाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. त्यानुसार ४ मे रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत संशयास्पद दाव्यांबाबत तक्रार नोंदवता येणार असल्याची माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या नीट परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकारामुळे देशभरात खळबळ उडाली. या प्रकरणी काहींना अटकही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, एनटीएकडून ४ मे रोजी देशभरातील ५५२
शहरे, परदेशातील १४ शहरांमध्ये ‘नीट यूजी २०२५’ परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. ही परीक्षा दुपारी दोन ते पाच या एकाच सत्रात घेतली जाणार आहे. लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये, या दृष्टीने एनटीए प्रयत्नशील आहे. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांमध्ये सहभागी होऊ नये, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या अनुषंगाने एनटीएने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, संशयास्पद दावे करणाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. त्यात कोणाही व्यक्तीच्या भूलथापांना बळी न पडता नीट यूजी २०२५
परीक्षेचा पेपर मिळवून देण्याचा दावा करणारी संकेतस्थळे, समाजमाध्यम खाती, नीट परीक्षेची प्रश्नपत्रिकेचा आशय उपलब्ध असल्याचे भासवणाऱ्या व्यक्ती, एनटीए किंवा सरकारी अधिकारी असल्याचे सांगणारे लोक यांच्याविरोधात थेट तक्रार करता येणार आहे. तक्रार करण्यासाठीचा अर्ज अतिशय सुलभ असून, त्यात सविस्तरपणे निरीक्षणे नोंदवता येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संशयास्पद दावे करणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठीची व्यवस्था ही सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांची प्रतिबंधक) कायदा, २०२४शी सुसंगत आहे. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांचा बंदोबस्त करणे आणि इच्छुक उमेदवारांचे भविष्य सुरक्षित करणे हा या कायद्याचा उद्देश आहे. त्यामुळे संशयास्पद दाव्यांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मुदत असल्याचे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.