पुणे : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून (एनटीए) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा-पदवीपूर्व (नीट-पीटी) ही परीक्षा ५ मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यासाठी ९ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या शहरांमध्ये यंदा वाढ करण्यात आली आहे. एनटीएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमबीबीएस, बीएएमएस अशा विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी नीट-यूजी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. तसेच चार वर्षांच्या बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
हेही वाचा : देशातील पहिले ऑलिम्पिक भवन म्युझियम पुण्यात
एनटीएने दिलेल्या माहितीनुसार ५ मे रोजी परीक्षा होणार आहे, तर १४ जन रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठीसह एकूण तेरा भाषांमध्ये ही परीक्षा देता येते. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, शुल्क आदी तपशीलही जाहीर करण्यात आला आहे. ९ मार्चपर्यंत अर्ज भरल्यानंतर त्यातील दुरुस्तीसाठी संधी दिली जाणार आहे. परीक्षा केंद्र असलेल्या शहरांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या ४९९ शहरांऐवजी आता ५५४ शहरांमध्ये परीक्षा केंद्र असतील. या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांच्या पसंतीची चार शहरे निवडता येणार आहेत.